breaking-newsराष्ट्रिय

मुंबई साखळी स्फोट प्रकरणातील आरोपीला 25 वर्षांनंतर अटक

  • गुजरात एटीएसची कारवाई 

अहमदाबाद – मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील महत्वाच्या आरोपीला तब्बल 25 वर्षांनंतर अटक करण्यात यश आले आहे. अहमद शेख उर्फ अहमद लंबू (वय 52) असे त्याचे नाव आहे. तो कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार मानला जातो.

शेख याला गुरूवारी सायंकाळी दक्षिण गुजरातच्या वलसाड किनाऱ्यावर पकडण्यात आले. गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मिळालेल्या माहितीच्या आधारे ही महत्वपूर्ण कारवाई केली. त्याला आता सीबीआयच्या ताब्यात सोपवले जाणार आहे. मुंबईत मार्च 1993 मध्ये झालेल्या विविध स्फोटांत 257 जण मृत्युमुखी पडले, तर 700 हून अधिक जखमी झाले. त्या स्फोटांनंतर शेख फरार होता. त्याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या अटकेसाठी उपयुक्त ठरणारी माहिती मिळवण्याच्या उद्देशातून पाच लाख रूपयांचे इनामही जाहीर करण्यात आले होते.

मुंबईत राहणाऱ्या शेखने स्फोटांनंतर लगेचच देशाबाहेर पलायन केले होते. दाऊदच्या निर्देशावरून मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यात आले. त्यासाठी भारतात तस्करीमार्गाने स्फोटके आणण्याच्या आणि स्फोट घडवण्याच्या कटात शेख सामील होता. या कटात सामील असणाऱ्या मोहम्मद डोसाने शेख याची दाऊदशी भेट घडवून आणली. दाऊदने दुबईमध्ये स्फोटांचा कट रचला. त्यासाठी झालेल्या बैठकीला शेख हजर होता. दाऊदच्या निर्देशावरून शेख आणि इतर काही जण बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानला गेले. रायगड किनाऱ्यावर आरडीएक्‍स स्फोटके उतरवण्यात शेखही सामील असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button