breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

  • ‘कयार’ चक्रीवादळ कोकणच्या किनारपट्टीजवळ

मुंबई/ पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर ‘कयार’ नावाच्या चक्रीवादळात झाले असून ते राज्याच्या किनारपट्टीपासून १९० किलोमीटरवर आहे. परिणामी, येत्या २४ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार, तर राज्याच्या उर्वरित भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा, मिऱ्या, जयगड बंदरात इतर राज्यांमधील हजारो नौका आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आठवडय़ापासून पाऊस सुरू आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी रत्नागिरीपासून १९० किलोमीटर, तर मुंबईपासून ३४० किलोमीटरवर होते. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये सोसाटय़ाचा वारा वाहत आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या २४ तासांत कोकण, गोवा, कर्नाटकात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळ ओमानच्या दिशेने

कोकणच्या किनारपट्टीपासून जवळ असलेले ‘कयार’ चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. ते येत्या पाच दिवसांत ओमानच्या किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव कमी होईल आणि पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button