मुंबई

मुंबईला बांग्लादेशी घुसखोरांचा विळखा

मुंबई – आसाममध्ये 40 लाख बांग्लादेशी घुसखोरांवरून देशात संतप्त पडसाद उमटले असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरालाही बांग्लादेशी घुसखोरांचा विळखा पडला आहे.

मुंबईमध्ये सध्या 15 ते 17 लाख बांग्लादेशी अवैधरित्या वास्तव्य करून आहेत. राजकिय नेत्यांच्या आशिर्वादाने या घुसखोरांनी कुलाब्यासह मानखुर्द, गोवंडी आदी परिसरांत त्यांनी अवैध झोपडया बांधल्या आहेत, असा आरोप भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केला. देशाच्या सुरक्षिततेला धोकादायक असलेल्या या घुसखोरांना हाकलून देण्यासाठी आसामप्रमाणे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (एनआरसी) लागू करावी, अशी मागणी पुरोहित यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, पोलीस आयुक्त याच्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

राज पुरोहित मंत्रालयात पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, बांग्लादेशींना अवैधरित्या भारतात वसविण्याचे मोठे षडयंत्र आहे. दहशतवाद्यांना जसे हॅंडलर असतात तसेच यांचे हॅंडलर आहेत. भारतातील प्रमुख शहरांत त्यांना आणून वसविण्यात येते. ममता बॅनर्जी यांचे सरकार त्यांना यात पूर्ण मदत करत आहे. सर्व कायदेशीर कागदपत्रे त्यांना तयार करून देण्यात येतात. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत त्यांच्या वस्त्या वाढायला लागल्या आहेत. एकटया मुंबईत 15 ते 17 लाख बांग्लादेशी अवैधरित्या राहत आहेत. यात नवी मुंबई,ठाणे आदींचा समावेश नाही तो केला तर हा आकडा आणखीन भयावह होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मुंबईतील मोक्‍याच्या जागांवर त्यांनी झोपडया बांधल्या आहेत. मुंबईतील चाळींमध्ये राहणारा सर्वसामान्य कर भरणारा मुंबईकर वाछयावर सोडला जातो. या अवैध बांग्लादेशीयांना मात्र मोफत घरांसह सर्व सुविधा मिळत आहेत. यासाठीच एनआरसी मुंबईसह महाराष्ट्रात लागू केले पाहिजे असे राज पुरोहित म्हणाले.

ममता बॅनर्जींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा 
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आशिर्वादानेच बांग्लादेशी संपूर्ण देशभरात फैलावत आहेत. बांग्लादेशींवर कारवाई केली तर भारतात गृहयुद्ध होईल असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे. यासाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही राज पुरोहित यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button