TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत संशयित गोवर रुग्ण संख्या तीन हजार

मुंबई : मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी या आजाराची संशयित रुग्णसंख्या २ हजार ८६० झाली असून १७६ रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आणखी एका बाळाचा मृत्यू झाल्याने संशयित मृतांची संख्या नऊ झाली आहे. हा मुलगा भिवंडी येथील असून, त्याला ७ नोव्हेंबरपासून ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होता. त्याचा १७ नोव्हेंबरला महापालिकेच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सध्या सात बालकांना प्राणवायू देण्यात येत असून, दोन जण जीवसुरक्षा यंत्रणावर (व्हेंटिलेटर) आहेत.

मुंबईमध्ये दोन महिन्यांपासून गोवरचा उद्रेक झाला आहे. १८ नोव्हेंबरला ३२ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून, ७ नोव्हेंबरपासून आतापर्यंत १३७ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामध्ये ० ते ८ महिन्यांचे १८, ९ ते ११ महिन्यांचे ९, १ ते ४ वर्षे ६४, ५ ते ९ वर्षे २८, १० ते १४ वर्षे ९ आणि १५ वर्षे आणि त्यावरील ९ रुग्णांचा समावेश आहे. गोवर रुग्णांची आतापर्यंतची संख्या १७६ वर पोहचली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी सात जणांवर प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांवर उपचार सुरू आहेत. तर दोन रुग्ण जीवसुरक्षा यंत्रणेवर आहेत. ४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४६ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मुंबईत आतापर्यंत नऊ संशयित गोवर मृत्युची नोंद झाली आहे. यापैकी एक मृत्यू  भिवंडी येथील आहे. या आजाराच्या संशयित मृत्यू असलेले नववे बाळ हे भिवंडीतील आहे.

लसीकरण वेगाने..

गोवरपासून बचाव करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त लसीकरणाची सत्रे सुरू आहेत. यामध्ये आतापर्यंत ७५४ लसीकरणाची सत्रे घेण्यात आली असून, त्यातून ७ हजार ६६० बाळांना एमआर १ आणि ६ हजार ३०२ बाळांना एमएमआर लस देण्यात आली आहे.

ठाण्यात विलगीकरण कक्ष..

ठाणे : मुंबई शहरापाठोपाठ ठाणे शहरात गोवर आजाराचे १३ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा रुग्णालयात गोवर आजाराच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाबरोबरच बालकांसाठी अतिदक्षता कक्षाची सुविधा निर्माण केली. शिळ आणि कौसा या भागात गोवर आजाराचे बाधित आढळून आल्याने या परिसरात २४ तास आणि सातही दिवस घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण करावे तसेच खाटा, औषधोपचार यांची कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. सर्व खासगी डॉक्टर आणि नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यावर संबंधित डॉक्टरांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या गोवरसदृश लक्षणे असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा नंबर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button