breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील वीजप्रश्नी सरकार नियामक आयोगाकडे दाद मागणार

चौकशीचे आदेश म्हणजे फक्त नाटक : निरुपम

मुंबई उपनगरातील वीजग्राहकांना अदानी कंपनीकडून आकारण्यात आलेले वाढीव वीज दर तसेच प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेताच वीज बिले देण्यात आल्याच्या तक्रारींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत तातडीने वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) दाद मागण्यात येणार आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंग आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी कंपनीकडून अचानक वीज देयकांमध्ये ५० ते १०० टक्के वाढ करण्यात आल्याच्या मुंबईकरांच्या तक्रारी आहेत. अवाजवी दरवाढीची चौकशी करण्यात यावी तसेच याबाबत वीज नियामक आयोगाकडे दाद मागावी, अशी मागणी करीत आमदार अ‍ॅड. शेलार यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या वेळी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्र्यांना दिले होते. शेलार यांनी सोमवारी ऊर्जा खात्याच्या सचिवांची भेट घेतली, तर ऊर्जामंत्र्यांशी संपर्क साधला. या प्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी सरकार वीज नियामक आयोगाकडे जाणार असल्याचे सचिव अरविंद सिंग यांनी सांगितल्याची माहिती शेलार यांनी दिली. सरकारने आपल्या मागणीची दखल घेत तातडीने आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही होऊन मुंबईकरांना न्याय मिळेलच; पण हा प्रश्न निकाली निघेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात काँग्रेसला उशिरा जाग आली असून ते श्रेयाचे राजकारण करण्याची संधी साधत आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.

मुंबईतील उपनगरांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून वीजदरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे जनता त्रस्त असून मुंबईकरांची ही एक प्रकारे पिळवणूकच आहे. या प्रश्नावर मुंबई काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर सरकारला जाग आली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या वीज दरवाढीच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र चौकशीचे आदेश म्हणजे फक्त नाटक व देखावा असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. वीज नियामक आयोग व अदानी पॉवर लिमिटेड यांचे संगनमत असून दोघांनी मिळून ही वीज दरवाढ मुंबईकरांवर लादल्याचा आरोप करीत वीज नियामक आयोगाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button