मी विष्णूचा अवतार; गुजरातच्या दांडीबहाद्दर सरकारी अधिकाऱ्याचा दावा
अहमदाबाद: ‘मी कलकी असून, विष्णूचा दहावा अवतार आहे. मला जगाची चिंता आहे. त्यासाठी ध्यानधारणा करत आहे. कार्यालयात बसून मला ध्यानधारणा करता येणार नाही, म्हणून मी कामावर येऊ शकत नाही, असा दावा गुजरातमधील दांडीबहाद्दर सरकारी अधिकाऱ्यानं केला आहे.
रमेशचंद्र फेफरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. फेफरे हे सरदार सरोवर निगमच्या वडोदरा येथील कार्यालयात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मागील आठ महिन्यांत केवळ १६ दिवसच ते कामावर आले आहेत. त्यामुळे विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिशीला त्यांनी अजब उत्तर दिले आहे. ‘तुम्हाला खरं वाटणार नाही. पण मी विष्णूचा दहावा अवतार असून, आगामी काही दिवसांतच ते सिद्ध करून दाखवणार आहे. २०१० मध्ये कार्यालयात असताना मी कलकीचा अवतार आहे. माझ्यात दैवी शक्ती असल्याचा साक्षात्कार झाला,’ असा दावा फेफरे यांनी केला.
मला जगाची चिंता आहे. त्यासाठी मी घरी ध्यानधारणा करत आहे. कार्यालयात मला ध्यानधारणा करता येणार नाही. माझ्या ध्यानधारणेमुळं गेल्या १९ वर्षांपासून देशात चांगला पाऊस पडत आहे, असा दावाही त्यांनी केला.