breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन-२०२२ : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा ‘बब्बर शेर’ पुन्हा मैदानात!

  • भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची मोर्चेबांधणी
  • शहर संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘बब्बर शेर’ अशी ओळख असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्यासह वरिष्ठ आणि नवोदितांना सोबत घेवून महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला पायउतार करण्याची रणनिती आखली जात आहे. त्यामुळे लवकरच लांडे यांनी शहर संघटनेमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्नाबाबत त्यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. शहराला भेडसावणारा शास्ती हा कर पूर्ण माफ करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शास्तीकरातील थकबाकी वगळून मूळ मिळकत कर भरण्याबाबत तात्काळ आदेश काढून शहरवासीयांना दिलासा देण्याची भूमिका घेतली होती.
विधानसभा निवडणुकीत लांडे यांनी राष्ट्रवादीचे तिकीट न घेता अपक्ष निवडणूक लढवली. त्याचा फायदा भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांना झाला होता. मात्र, सध्यस्थितीला भाजपाचे ‘दोन शेर’ अर्थात आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना तोडीस तोड नेता राष्ट्रवादीकडे एकमेव आहे. लांडे यांनी १० वर्षे विधानसभेत नेतृत्व केले आहे. महापालिका प्रशासनाचा अभ्यास अन् अनुभव मोठा आहे. त्यामुळे भाजपाचे लांडगे आणि जगताप या दोन शेरांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी आता लांडे अर्थात ‘बब्बर शेर’ मैदानात उतरविणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

एका महिन्यात वातावरण बदलले…
विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय विजनवासात गेलेले माजी आमदार विलास लांडे आता कमालीचे सक्रिय झाले आहेत. शास्तीला कारणीभूत ठरलेली अनधिकृत बांधकामे ही नियमित करण्याची मागणी प्रथम केली. विशेष म्हणजे, आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेली भोसरीतील बालनगरी रद्द करून तेथे कला अकादमीचे राज्यातील केंद्र उभारणीसही त्यांनी विरोध केला आहे. डीपीसाठी पैसे देऊनही जागा ताब्यात न आल्याने त्याबाबत त्यांनी आवाज उठवला आहे. कोरोना काळातील अवास्तव दराने झालेल्या खरेदीला आक्षेप घेत त्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्याकडेच केली आहे. एकूणच भोसरीतीलच नाही, तर शहरातील प्रलंबित प्रश्नी आवाज उठवून लांडे यांनी शहर राष्ट्रवादीचे नेतृत्त्व करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

‘पद्मश्री’च्या निमित्ताने चिंचवडमध्येही एन्ट्री…
चिंचवडमधील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून अलौकिक कार्याचा ठसा उमटवणारे गिरीष प्रभूणे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्ताने लांडे यांनी प्रभूणे यांची भेट घेतली आणि अभिनंदनही केले. विशेष म्हणजे, शहरातील राष्ट्रवादीसह भाजपाशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून लांडे यांच्या संपर्कात आहेत. राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील कार्यालयासह भोसरी मतदार संघामध्ये बैठकांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे लांडे आता भाजपाला रोखण्यासाठी नव्या- जुन्यांचा मेळ घालून २०२२ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयाचे शिल्पकार होतील, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button