breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मालाडमध्ये बचावकार्य सुरूच

वाहून गेलेल्या झोपडय़ांचा अंदाज बांधणे कठीण

मुंबई : मालाड दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही मृतांचा आकडा वाढतोच आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ), अग्निशमन दल, पोलीस यांच्यासह स्थानिक रहिवासीही शोधकार्यात सामील झाले आहेत. या दुर्घटनेत नक्की किती झोपडय़ा वाहून गेल्या याचा नेमका अंदाजच कोणाला लावता आलेला नाही. रुग्णालयातून शवविच्छेदन होऊन आलेले मृतदेह ठेवण्यासाठी घरच नाही. त्यामुळे बांबूच्या साहाय्याने ताडपत्रीचे तात्पुरते छप्पर उभारून त्याखालीच सर्व अंत्यसंस्कार सुरू आहेत.

आंबेडकरनगरचे रहिवासी गेली ३५ वर्षे वन खात्याच्या जमिनीवर वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री १२ नंतर दिवस पालटला आणि रहिवाशांचे नशीबही. वन खात्याने आपल्या जमिनीसाठी बांधलेली साधारण १० फूट संरक्षक भिंत रहिवाशांच्या जिवावर उठली. डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही मार्गच नसल्याने भिंतीएवढय़ा उंचीपर्यंत पाणी तुंबले. त्यामुळे आंबेडकरनगर आणि पिंपरीपाडा वसाहतीवर भिंत कोसळली. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढय़ासोबत कित्येक झोपडय़ा वाहून गेल्या.

वैशाली घाणेकर यांची मुलगी अनिता आणि जावई अनिल सावंत या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या दोन्ही नाती वाचल्या. एका नातीच्या पायाला तर दुसऱ्या नातीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. २००४ सालीही अशाच प्रकारे भिंत कोसळून १५ जण जखमी झाल्याचे येथील रहिवासी राजेश साळुंखे सांगतात. मात्र ती घटना कोणीच गांभीर्याने घेतली नाही. चिरडलेल्या लोखंडी कपाटाची दारे हातोडय़ाने तोडून रहिवासी आपले सामान गोळा करत आहेत. ३५ वर्षांच्या संसाराचा ढीग उपसण्यापलीकडे आता त्यांच्या हातात काहीच उरलेले नाही.

‘टीव्हीवर दिसलो तर कोणी तरी आमच्याकडे लक्ष देईल’, या आशेपायी हे लोक येणाऱ्या-जाणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना ओरडून ओरडून आपली व्यथा सांगत आहेत. भिंतीचा पडलेला भाग क्रेनने उचलला जात असून वाकलेली भिंत फोडून पाडली जात आहे. सर्व व्यक्तींचा शोध लागत नाही तोपर्यंत शोधकार्य असेच सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही स्वयंसेवी संस्थाही मदतकार्य करत आहेत.

काम करणाऱ्या जवानांना विविध संस्थांतर्फे जेवण आणि पाणी पुरवले जात आहे. त्याचे वाटप करण्याची जबाबदारीही स्थानिक रहिवाशांनीच घेतली आहे. काही रहिवाशांचे स्वतचे घर वाहून गेले नसले तरीही इतरांना वाचवण्यात ते जखमी झाले आहेत. ज्या झोपडय़ा वाचल्या त्यांच्यात पाणी शिरले आहे. ते उपसण्यात कालचा पूर्ण दिवस गेला. ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न मात्र तसाच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button