आंतरराष्टीय

मानवी हक्कांसाठी लढणारी महिला देशद्रोहाच्या आरोपामुळे पाकमधून परागंदा

अमेरिकेला राजकीय आश्रयाची विनंती

न्यू यॉर्क :  देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आलेल्या पाकिस्तानातील महिला कार्यकर्त्यां गुलालाई इस्माईल (३२) या पाकिस्तानातून परागंदा झाल्या असून त्यांनी अमेरिकेत राजकीय आश्रयाची मागणी केली असल्याचे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे.

परदेशात देशविरोधी कारवाया केल्याबद्दल गुलालाई यांचे नाव एक्झिट कंट्रोल यादीत (ईसीएल) टाकावे, अशी शिफारस पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने केली होती. गुलालाई गेल्या महिन्यात पाकिस्तानातून परागंदा झाल्या असून त्या सध्या ब्रूकलिन येथे बहिणीसमवेत वास्तव्य करीत आहेत, असे वृत्त गुरुवारी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिले आहे.

गेल्या मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या गुलालाई यांनी त्या पाकिस्तानातून कशा परागंदा झाल्या त्याची मााहिती दिलेली नाही. आपण कोणत्याही विमानतळावरून उड्डाण केले नाही आणि यापेक्षा अधिक आपण सांगू शकत नाही, कारण त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात जाईल, असे गुलालाई यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

परदेशामध्ये देशविरोधी कारवाया केल्याबद्दल गुलालाई यांचे नाव ईसीएलमध्ये टाकण्याची शिफारस आयएसआयने केली असल्याचे गेल्या नोव्हेंबर महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयास सांगण्यात आले होते. मात्र गुलालाई यांनी दिलेल्या आव्हानानंतर न्यायालयाने त्यांचे नाव ईसीएलमधून काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button