breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मानकरांना दि.6 ऑगस्टपर्यंत “मोक्‍का’ कोठडी

पुणे – जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी माजी उपमहापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसवेक दीपक मानकर यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्यांना विशेष न्यायाधीश एस. ए. महात्मे यांनी 6 ऑगस्टपर्यंत “मोक्‍का’ कोठडी सुनावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मानकर बुधवारी सकाळी परिमंडळ -2 च्या सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांच्या कार्यालयात हजर झाले. त्यांना न्यायालयाने पुढील दहा दिवसांत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी दिले. त्यानुसार मानकर शरण आले. मानकर यांच्याकडे अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप याने दि. 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी जगताप यांनी लिहलेल्या चिठ्ठीत “दीपक मानकर, सुधीर कर्नाटकीसह इतर सहा ते सात जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे,’ असे म्हटले होते. त्यानुसार जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद भोळे (34, रा. घोरपडी पेठ), सुधीर सुतार (30, रा. कोथरुड), अमित तनपुरे (28, रा. मांडवी.), अतुल पवार (36) आणि विशाल कांबळे (30, रा. येरवडा), नाना कुदळे (रा. केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक करण्यात आली होती. तर मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कर्नाटकी यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तर, अटकपूर्व जामिनासाठी मानकर यांनी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र, तीन खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मानकर यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी युक्तिवाद केला की, “मृत हे त्या जमिनीची देखभाल करत होते. प्राथमिकदृष्ट्या हा गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही मानकर यांचा जामीन फेटाळला आहे. मानकर हे टोळीचे प्रमुख असून त्यांचा व्ययवसाय हा दहशतीच्या जोरावर जागेचे ताबे घेणे आहे. त्यामुळे त्यांच्यावर “मोक्का’ नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी अॅॅड. पवार यांनी केली.

बचाव पक्षाच्या वतीने अॅॅड. सुधीर शहा, अॅॅड. चिन्मय भोसले, अॅॅड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले. शहा म्हणाले, “आजवर मानकर यांच्यावर दाखल असलेल्या 15 पैकी 14 गुन्ह्यांत न्यायालयाने दिलासा दिला आहे. तर, एक गुन्हा प्रलंबित असून त्यातही त्यांची भूमिका नाही. त्यामुळे “मोक्‍का’ चुकीच्या पद्धतीने लावला आहे. मूळ जमीनही मानकरांचीच असून मृत जगताप हे तेथे देखभाल करत होते. त्यामुळे या प्रकरणात 306 लागू होत नाही,’ अशी बाजू त्यांनी मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button