breaking-newsपुणेमहाराष्ट्र

माझा राग विठ्ठलावर नव्हे ; त्यांच्याशेजारील बडव्यांशी भांडण आहे – ‘उपरा’कार लक्ष्मण माने

पुणे : माझा राग विठ्ठलावर नाही. मात्र त्यांच्याजवळ असलेल्या बडव्यांशी भांडण आहे, असे “उपरा’कार लक्ष्मण माने यांनी आज येथे सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून त्यांचे कट्टर विरोधक प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेल्या माने यांनी बोलताना भूमिका आज स्पष्ट केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी पवारांचे कट्टर विरोधक प्रकाश आंबेडकर यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकर यांच्याकडून राज्यात तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. माने हे खरेतर पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भटक्‍या जमातीतील मुलांसाठी सातारा येथे माने यांनी आश्रमशाळा सुरू केली. या माध्यमातून एक चांगली शिक्षणसंस्था उभी राहिली. याच काळात पवार यांनी माने यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली. सारी कारकिर्द पवार यांनी घडवल्यानंतरही माने यांनी पवारांना सोडून जाण्यावरून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात बोलताना माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शरद पवार आजही माझ्यासाठी महत्वाचे आहेत. माझ्यासाठी ते विठ्ठलच आहेत. मात्र त्यांच्याशेजारी असलेल्या लोकांमुळे नुकसान होत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या अनेकांच्या जातीय भावनांचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. ठराविक लोकांचे कोंडाळे आहे. त्यांच्याशिवाय इतरांना स्थान दिले जात नाही. ही भावना मी पवार यांच्या कानावरदेखील घातली. मात्र त्यावर काहीच होत नाही. भटक्‍यांच्या प्रश्‍नावर गेल्या कित्येक वर्षापासून मी काम करीत आहे. पवार यांची त्यात मोलाची मदत मला झाली आहे. मात्र आता त्यांच्या जवळचेच लोक आमची अडवणूक करू लागले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून राज्यात समर्थ अशी तिसरी आघाडी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button