breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महिला व बाल कल्याण समितीचा कहर

खर्चाला मंजुरी न घेताच, सदस्य निघाले केरळ दौ-यावर
पाच सदस्यांचा उद्या टेक ऑफ

पिंपरी – कार्यकाळ संपत आल्याने महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने सदस्यांचा केरळ दौरा नियोजित केला आहे. अभ्यास व प्रशिक्षण दौ-याच्या नावाखाली समितीचे पाच सदस्य 8 ते 13 एप्रिल दरम्यान केरळ दौ-यावर निघाले आहेत. मात्र, दौ-यावर होणा-या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी मिळण्यापूर्वीच हा दौरा होणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. तरी देखील समितीने सदस्यांसाठी 8 ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये केरळ दौरा नियोजित केला आहे. या दौ-यामध्ये केरळ सरकारच्या कल्याणकारी योजनांचा अभ्यास करून त्याचे प्रशिक्षणही घेतले जाणार आहे. समितीच्या पाच सदस्यांसह अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक समन्वयक देखील सोबत जाणार आहे. अशा सहा व्यक्तींच्या दौ-यासाठी 3 लाख 37 हजार 860 एवढा खर्च होत आहे.

खर्चाची रक्कम घेण्यासाठी बुधवारी (दि. 28) स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र, बुधवारची सभा तहकूब झाल्याने या विषयाला मंजुरी मिळाली नाही. आता या विषयाला येत्या बुधवारी (दि. 11) स्थायीची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तत्पुर्वीच महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांना केरळ दौ-याची घाई झाली आहे. त्यामुळे समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अभ्यास दौरा ठरणार निष्फळ?

अभ्यास आणि प्रशिक्षण घेण्यासाठी केरळ दौरा नियोजित केला आहे. असा प्रस्ताव महिला व बाल कल्याण समितीने तयार केला आहे. मात्र, समितीचा कार्यकाळ मुळात 14 एप्रिल पर्यंत राहिला आहे. जर सदस्यांनी केरळमध्ये जाऊन तेथील सरकारच्या कल्याणकारी योजनांचा अभ्यास केला, त्याचबरोबर प्रशिक्षणही घेतले तर त्याची अंमलबजावनी करण्यास मर्यादा येणार आहे. कारण, समितीची मुदत दौ-यानंतर दुस-याच दिवशी संपणार आहे. त्यामुळे अभ्यास आणि प्रशिक्षणाचा शहरातील विविध घटकातील नागरिकांना कसलाच उपयोग होणार नाही, हे स्पष्ट होत आहे. तसेच, मुदत संपल्यानंतर नवीन समिती स्थापन होणार आहे. त्यामुळे नवीन सदस्य जुन्या सदस्यांचे प्रशिक्षण अथवा अभ्यासाची अंमलबजावनी होऊ देणार नाहीत. तरीही, समितीने केरळ दौ-याचा अट्टाहास कशासाठी धरला आहे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
——————

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button