breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महिनाभरात १०० एसी बस

प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ बातमी; नोव्हेंबपर्यंत आणखी ३०० मिनी बस ताफ्यात

मुंबई : भाडेकपात झाल्यानंतर प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्याकरिता बसचा ताफा वाढविण्याबरोबरच प्रवाशांना स्वस्तात गारेगार प्रवाशाची संधी देण्याकरिता भाडेतत्त्वावरील ४०० वातानुकूलित मिनी बसगाडय़ा दाखल करण्याचा निर्णय मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यातील १०० बसगाडय़ा ऑगस्टमध्ये तर उर्वरित नोव्हेंबरमध्ये महिन्यात दाखल होतील. यासाठी मूळ प्रकल्पात असलेल्या ४५० मिडी-मिनी वातानुकूलित व विनावातानुकूलित बसच्या प्रस्तावात बेस्ट उपक्रमाकडून बदल करण्यात आला.

बेस्ट उपक्रमाने मंगळवारपासून भाडेकपात लागू केली. यामुळे साध्या बसचा पाच किलोमीटरसाठी पाच रुपये, तर वातानुकूलितचा प्रवास सहा रुपये झाला. सध्या बेस्टकडे बसचा ताफा कमी आहे. स्वस्त प्रवास झाल्याने प्रवासी संख्या वाढतील, हे गृहीत धरून बेस्ट वर्षभरात बसचा ताफा वाढविणार आहे. वातानुकूतिल प्रवासही स्वस्त झाल्याने बेस्टकडून वातानुकूलित बसची संख्याही वाढविली जाणार आहे. सध्या बेस्टकडे २५ वातानुकूलित गाडय़ा आहे. भाडेतत्त्वावर आणखी मिडी व मिनी वातानुकूलित बसही दाखल करणार आहेत. यात विनावातानुकूलित बसचाही समावेश आहे.

आधी ४५० बसचा प्रस्ताव होता. त्यामध्ये २०० मिनी वातानुकूलित, २०० मिनी वातानुकूलित आणि ५० मिडी विनावातानुकूलित बसचा समावेश होता. फेब्रुवारी महिन्यात याकरिता दोन कंत्राटदारांची निवडही करण्यात आली. परंतु कामगार संघटनांनी भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांना केलेला विरोध आणि त्यामुळे बसगाडय़ा ताफ्यात करण्याच्या प्रक्रियेला झालेला विलंब पाहता मिडी बस देण्यास असमर्थता दर्शविली. परिणामी बेस्टने मूळ प्रस्तावात बदल करत ४५० ऐवजी ४०० वातानुकूलित मिनी बस दाखल करण्यावर मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. उत्पन्नवाढ, वाहतूक कोंडीतून सुटका या उद्देशाने मिनी बस येतील, अशी माहिती या वेळी दिली.

कर्मचारी भरतीची मागणी

बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी समितीच्या बैठकीत मूळ प्रस्तावात केलेल्या बदलाला आक्षेप घेतला. फेरनिविदा मागवणे आवश्यक होते, परंतु बेस्टने त्या प्रक्रियेला डावलले हे चुकीचे आहे. या गाडय़ा चालवण्यासाठी बेस्टच्या निवृत्त चालक व बेस्ट कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याची मागणीही केली. तर मिनी बस रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही चालविण्यात याव्यात, अशी सूचना केली.

काँग्रेसचे रवी राजा यांनी मिनी बस मात्र विनावाहक चालवण्यात येऊ नये, अशी मागणी केली. बेस्टमध्ये २०० ते ३०० वाहकांची कमतरता असून मिनी बस चालवण्यासाठी वाहकांची भरती करावी, असे शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ यांनी सांगितले.

बेस्टची प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढवण्यासाठी बसगाडय़ांचा ताफा दहा हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या मुंबईकरांची वातानुकूलित बससाठी मागणी असून त्यानुसार बेस्टच्या ताफ्यात सर्व ४०० बस दाखल केल्या जातील. भाडेकपातीमुळे वांद्रे संकुलात चालवण्यात येणाऱ्या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.

– सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button