breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘महायुती’चे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात कलाटे बंधूंची ‘महाआघाडी’ (Video)

  • मयूर कलाटेंनी प्रचाराची धुरा घेतली स्वतःच्या खांद्यावर
  • आमदार जगतापांच्या पराभवासाठी आखली व्युवरचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार राहूल कलाटे आणि त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे स्थायी समिती सदस्य मयूर कलाटे एकवटले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विरोधी पॅनेलमध्ये असतानाही अंतर्गत वैर बाजुला सारून मयूर कलाटे आणि कुटुंबीय चुलत बंधू असलेल्या राहुल कलाटे यांच्या मदतीला धावले आहेत. याला पुष्टी देणारा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

भाजप-शिवसेना-रिपाइं आणि तत्सम विचारसरणीच्या घटक पक्षांची महायुती झाल्याने चिंचवड विधानसभा मतदार संघ भाजपकडे गेला. त्याठिकाणी भाजपने आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते राहूल कलाटे यांचे तिकीटाचे स्वप्न भंग पावले. त्यांनी जगतापांना शह देण्यासाठी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यातच राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने नेते अजित पवार यांनी राहूल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला. शिवाय, वंचित बहुजन आघाडीचाही कलाटे यांना पाठिंबा मिळाला आहे.

वाकडचे नगरसेवक राष्ट्रवादीचे युवा नेते मयूर कलाटे आणि अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांच्यातील राजकीय स्पर्धा  सर्वश्रृत आहे. परंतु, अजित पवारांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी हे वैर बाजुला ठेवून बंधुप्रेम व्यक्त करत प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत, असे चित्र दिसत आहे. वाकड येथील एका कार्यालयात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत मयूर व राहुल कलाटे यांचे मोठे बंधू संजय कलाटे यांनी कलाटे कुटुंबियांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

विशेष म्हणजे, आमदार जगतापांच्या विरोधात वाकडमध्ये कलाटे बंधू एकत्र आले आहेत. जगताप यांचा पराभव करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. आता वाकडमधील कलाटे गावकी-भावकी एकत्र आली असून लोकांच्या भेटीगाठी, बैठका घेण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे जगतापांना वाकडमधून फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.

https://www.facebook.com/mahaenews1/videos/135429127843634/

लोकसभेतील महायुतीचे मताधिक्य तुटणार का?

मयूर कलाटे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असले तरी त्यांचे भाजपतील नगरसेवक तुषार कामठे, थेरगावचे शिवसेनेचे निलेश बारणे, चिंचवडचे सचिन चिंचवडे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मध्यंतरी ‘दिल दोस्ती…दुनियादारी’ अशा ‘थीम’ द्वारे मयूर कलाटे यांनी आमदार जगताप यांच्याविरोधात सुप्त उठाव केला होता. आता राहूल कलाटे यांना पाठिंबा देऊन त्यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, असे बोलले जाते. त्यांचे मित्रत्वाचे संबंध हे देखील उमेदवार राहूल कलाटे यांच्या फायद्याचे ठरतील, अशी त्यांच्या समर्थकांची भूमिका आहे. कारण, यापूर्वी पक्षीय मतभेद आणि राजकारण बाजुला सारून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकाच फ्लेक्सवर त्यांचे चेहरे झळकलेले शहराने पाहिले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे चिंचवड मतदार संघात सुमारे एक लाखाच्या फरकाने पिछाडीवर होते. आता खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप एकत्र आहेत. त्यामुळे लोकसभेतील महायुतीचे मताधिक्य विधानसभा निवडणुकीत कलाटे बंधू कमी करू शकतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button