breaking-newsमहाराष्ट्र

महापौर विरुद्ध तुकाराम मुंढे शीतयुद्ध

  • नाशिकच्या आयुक्तांना शह देण्याकरिता ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रम

नाशिक – महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात टोकाला गेलेल्या संघर्षांचे रूपांतर आता शीतयुद्धात झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव बारगळला. त्यांना हटविणे शक्य नसल्याची खात्री पटल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोधाची धार कायम ठेवत पद्धत बदलली. आयुक्तांची त्रिसूत्री, आर्थिक नियोजनाला सुरुंग लावत निर्णय घेण्याचे धोरण स्वीकारले. इतकेच नव्हे तर, मुंढे हे ज्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमातून लोकप्रिय होत आहेत, त्याला शह देण्याकरिता भाजपनेही आता ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाची घोषणा केली. राजकीय मंडळींच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याकरिता खुद्द मुंढे यांनी जनतेसमोर आपली बाजू मांडण्याचा मार्ग अनुसरला आहे.

पालिका प्रशासन-राजकीय संघर्षांचे मूळ नियमांच्या चौकटीत दडलेले आहे. या चौकटीत हवा तसा कारभार करता येत नाही. यामुळे मुंढे यांना हटविण्यासाठी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी निकराचे प्रयत्न केले.  त्यातही मुंढे यांचे समर्थन आणि विरोध यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि स्थायी सभापती डॉ. हिमगौरी आहेर-आडके या मुंढे समर्थक गटाच्या मानल्या जातात. अलीकडेच पक्षाच्या बैठकीत फरांदे यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केल्यावर भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांनी त्यांना अक्षरश: धारेवर धरले. आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणताना सादर केलेल्या पत्रावर स्थायी सभापतींनी स्वाक्षरी केली नव्हती. त्याची सल मुंढेविरोधी गटात आहे. त्यातून स्थायीच्या सभेत भाजपचे सभागृह नेते आपल्याच पक्षाच्या सभापतींवर आगपाखड करतात. एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष आमदार सानप यांनी पालिकेवर आपल्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले. शहरातील भाजपचे अन्य दोन आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलले गेले. आयुक्तपदी मुंढे आल्यानंतर सानप यांच्यासह त्यांच्या गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले.

विरोधी गटाने मुंढे यांच्या भूमिकेला छेद देणारे निर्णय घेत प्रशासनावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयुक्तांनी कामासाठी त्याची निकड, निधी आणि तांत्रिक योग्यता ही त्रिसूत्री निश्चित केली. प्रारंभीच त्यांनी २५७ कोटींची रस्त्यांची कामे रद्द केली होती. दुर्लक्षित भागात रस्ते बांधणीला प्राधान्य देण्याचे जाहीर केले. परंतु, पालिकेवरील दायित्व वाढले तरी प्रत्येक प्रभागात सदस्यांनी सुचविल्यानुसार रस्त्यांची कामे करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. पालिकेच्या शहर बस सेवेत परिवहन समितीला मुंढे यांनी विरोध केला होता. सत्ताधाऱ्यांनी तो विषय प्रतिष्ठेचा करून मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला. बस सेवेच्या प्रस्तावाला मंजुरी देताना परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. आयुक्तांच्या स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद येथे नियोजनबद्ध नगर वसविण्याच्या प्रस्तावाला भाजपमधून असाच विरोध होत आहे. मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊनही मालमत्ता करवाढीची खदखद पक्षीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. सर्वसाधारण सभेत आयुक्तांना लक्ष्य करताना भाजपने विरोधकांची मदत घेतली. शहरवासीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘वॉक विथ कमिशनर’च्या धर्तीवर आता ‘महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. अविश्वास प्रस्ताव बारगळल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि आयुक्त यांच्यातील मतभेद कमी होण्याऐवजी अधिकच वाढल्याचे चित्र आहे.

आरोपांना आयुक्तांचे प्रत्युत्तर

राजकीय नेत्यांकडून आरोपांची राळ उडविली जाते. त्यावर संधी मिळेल तेव्हा आयुक्त तुकाराम मुंढे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्यात स्थगित राहिलेला ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम नव्याने सुरू करत त्यांनी नागरिकांशी पुन्हा संवाद सुरू केला आहे. तो अधिकधिक वाढविण्यावर त्यांचा भर आहे. अ‍ॅड. द. तु. जायभावे प्रतिष्ठानच्या वतीने ‘स्मार्ट सिटी संकल्पना आणि अंमलबजावणी’ या विषयावर आयोजित ‘टॉक विथ कमिशनर’ कार्यक्रमात त्यांनी समतोल विकासाच्या संकल्पना अधोरेखित केल्या. कर्मचारी संघटना, राजकीय पक्षांकडून होणारे आरोप खोडून काढले. त्या आरोपांमागील दुखणे उलगडून दाखविले. पालिकेचे उत्पन्न आणि खर्च, विकासकामे, भूसंपादन आदींसाठी लागणारा निधी, उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची निकड, शहर डोळ्यासमोर ठेवून केलेले नियोजन आदींची आकडेवारीसह तपशीलवार माहिती सादर केली. चोवीस तास पाणीपुरवठा, शहरात ९० हजार स्मार्ट दिव्यांचा प्रकल्प, भुयारी गटार आदी योजनांवर प्रकाशझोत टाकला. महापालिकेला आर्थिक शिस्त मोडणे परवडणारे नाही. भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील याची जाणीव त्यांनी समस्त नगरसेवकांना करून दिली आहे. नगरसेवक कामे होत नसल्याची ओरड करतात, तर दुसरीकडे करवाढीला विरोध केला जातो. या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत मुंढे यांनी आरसा दाखविण्याचे कार्य कायम ठेवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button