breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौरांना सावरून घेण्यासाठी आमदार जगतापांची शिक्षकांसमोर दिलगिरी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राजकारण्यांमध्ये जसे गटतट असतात तसे शिक्षकांमध्ये सुध्दा गटतट पडले आहेत. शिक्षक राजकारण करत नसतो, तर तो ज्ञानदानाचे कार्य करत असतो. याठिकाणी तर शिक्षकच राजकारणात अडकल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रामाणीकपणे कामाला लागा. उगाच आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असा इशारा महापौर राहूल जाधव यांनी शिक्षकांना दिला. महापौरांचा तोल सुटल्याचे लक्षात येताच भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना चक्क शिक्षकांसमोर दिलगिरी व्यक्त करावी लागली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.

महापौर राहूल जाधव यांनी महापालिकेच्या 108 शाळांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी शाळेची झालेली दुरवस्था, सुविधांचा अभाव याबरोबरच गुणवत्ता ढासळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिक्षकांना सुध्दा प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी स्वतः पाहिली. त्यामुळे शिक्षकांचे नेमके चुकते कुठे हे त्यांनी आजच्या कार्यशाळेत सांगितले. राजकारणात जसे गटतट असतात तसे गटतट आता शिक्षकांमध्ये पडले आहेत. ज्ञानदानाचे काम करण्याऐवजी काही शिक्षक उगीच राजकारण करून कार्यक्षम शिक्षकांसमोर अडचणी निर्माण करत आहेत. कोणतातरी राजकीय पदाधिकारी पाठीशी उभा राहिला की तो शिक्षक त्या शाळेतील हेडमास्तर असल्यासारखा वागत असतो. अशा शिक्षकांना विद्यार्थी हिताचे कसलेही देणेघेणे नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे. यासाठी मनपा शाळेचे शिक्षकच जबाबदार असल्याचे महापौरांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कार्यशाळेत शिक्षकांची मने दुखावली गेली.

महापौरांनी खडेबोल सुनावल्यामुळे शिक्षकांमध्ये लागलीच कुजबूज सुरू झाली. त्यांच्या चेह-यावरील नाराजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दृष्टीपथास पडली. महापौरांकडून बोलताना काही चुकीचे बोलले गेले असले तरी महापौरांच्या वतीने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणून आमदार जगताप यांनी महापौरांची बाजू सावरून धरली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button