महापालिकेत मराठी पाट्यासाठी मनसेचे आंदोलन ; इंग्रजी पाट्यांना फासले काळे
पिंपरी- राज्य सरकारने मराठी भाषेची सक्ती केली आहे. परंतु, त्या आदेशाचे उल्लंघन करत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक विभागाच्या पाट्या इंग्रजीमध्ये होत्या. इंग्रजीतील पाट्यांवर मनसेने आज (सोमवारी) शाई फेकत काळे फासले. तसेच मराठी’ भाषेचा वापर करण्याची जोरदार मागणी केली.
या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिव राजू सावळे, रूपेश पटेकर, विभाग प्रमुख अंकुश तापकीर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, के.के.कांबळे, सीमा बेलापूरकर, अक्षय नाळे, अश्विनी बांगर, विद्या कुलकर्णी, नारायण पठारे, मयूर चिंचवडे, चंद्रकांत दाणवले, विशाल मानकरी सहभागी झाले होते.
महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावर असलेल्या कॉम्प्युटर सर्व्हर रूमच्या इंग्रजी फलकाला तसेच संगणक विभाग प्रमुख निळकंठ पोमण यांच्या कार्यालयाबाहेरील इंग्रजीतील फलकावर शाई फेकत काळे फासण्यात आले. तसेच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारच्या आदेशानुसार महापालिकेच्या कामकाजात मराठीचा वापर केलाच पाहिजे. पालिकेतील निविदा प्रक्रीया, ठेकेदारांचे करार, तसेच वर्क ऑर्डर हे मराठीत दिले गेले पाहिजे. महापालिका भवनातील प्रत्येक फलक हा मराठीतच असला पाहिजे. येत्या १५ दिवसांत याची अंमलबजावनी न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.