breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महापालिकेतील विषय समित्या होणार बरखास्त

  • चार समित्यांची 14 एप्रिलपर्यंत मुदत
  • नवीन समिती सदस्यांची 20 एप्रिल रोजी घोषणा

पिंपरी – महापालिकेच्या विविध विषय समित्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ 14 एप्रिल रोजी संपत आल्याने चार विषय समित्या बरखास्त होणार आहेत. त्यामुळे नवीन समित्या स्थापन करण्यात येणार असून नवीन सदस्यांना संधी दिली जाणार आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार महासभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती व्यतिरिक्त विधी समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, महिला व बालकल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती अशा चार समित्या आहेत. या समितीतील सदस्यांची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे चारही समित्या नव्याने स्थापन करण्यात येणार आहेत. त्यावर नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. पक्षिय बलाबलानुसार प्रत्येक समितीमध्ये बाजपचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक अशा नऊ सदस्यांना संधी मिळणार आहे. त्यांची निवड येत्या 20 एप्रिल रोजी होणा-या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. त्यानंतर सभापतीपदासाठी निवणूक घेण्यात येईल. विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सभापतींची निवड केली जाणार आहे.

विषय समितीत संधी मिळावी यासाठी नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास आत्तापासूनच सुरुवात केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नाराजांना विषय समित्या, प्रभाग समित्या, स्वीकृत सदस्य पदाची गाजरे दाखवून पक्षात तुंबवून ठेवले आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी नगरसेवकांना विषय समित्यांवर घ्यावे लागणार आहे. तथापि, बहुतांश नगरसेवकांना स्थायी समितीत संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, मोजक्याच नगरसेवकांना संधी दिल्याने उर्वरीत नाराजांना विषय समित्यांवर नेमणुका दिल्या जाणार आहेत. विशेषतः भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याही कार्यकर्त्यांचा विचार केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button