breaking-newsपुणेमहाराष्ट्र

महापालिकेचे खड्डे महामेट्रोच्या गळयात

  • पौड रस्ता, कर्वे रस्त्यावरील खड्डे मेट्रो दुरूस्त करणार

पुणे– पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावर महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील खड्डे आता महामेट्रोच दुरूस्त करणार आहे. महापालिकेने केलेल्या तकलादू रस्ते दुरूस्तीमुळे तसेच इतर खोदकामांमुळे खड्डयांचा भार आता महामेट्रोच्या गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाऊस तसेच या दोन्ही रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास या रस्त्यांवर होत आहे. या धर्तीवर दोन दिवसांपूर्वी महापालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक तसेच वाहतूक पोलीस आणि महामेट्रो अधिकाऱ्यांनी पौड रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेतही खड्डे दुरूस्तीची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे महापालिका आणि पोलिसांकडून या वाहतूक कोंडीचे खापर महामेट्रोवरच फोडण्यात आले आहे.

पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्याने महामेट्रोने रस्त्यामधील 9 मीटरचा भाग कामासाठी बंद केला आहे. दोन्ही बाजूला इतर वाहनांना जाण्यासाठी प्रत्येकी साडेसात मीटर रस्ता ठेवण्यात आला आहे. या रस्त्यांवर जवळपास वर्षभरापासून हे काम सुरू आहे. मात्र, पावसाने या दोन्ही रस्त्यांवरील वाहतुकीची अवस्था बिकट झाली असून 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच पौड रस्त्याची पाहणी झाली असून लवकरच कर्वे रस्त्याची पाहणी केली जाणार आहे. मात्र, यानंतर मेट्रोने या रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे वनाज-रामवाडी मेट्रो मार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी शुक्रवारी सांगितले.

वाहतूक पोलीस, पालिका ढिम्मच

पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यामागे खड्डे हे एकमेव कारण नाही. प्रत्यक्षात मेट्रोचे हे काम जेथे सुरू आहे, तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग आहे. त्याचे फलकही लावले आहेत. तर हे काम सुरू असताना; पादचाऱ्यांसाठी पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहेश. यात कोंडीला फक्‍त खड्डेच जबाबदार असल्याचे भासविले जात आहे. आधीच वाहतुकीसाठी फक्‍त साडेसात मीटर रस्ता असताना, सर्वत्र पार्किंग केली जात आहेत. तर पौड रस्त्यावर पीएनजी ज्लेलर्ससमोरील भुयारी मार्गावर तर खासगी बस कंपन्यांचा पीक-अप पॉइंट सुरू आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करतात की नाही? हा प्रश्‍न आहे. त्यातच महापालिकेने अजून या रस्त्यावर एकदाही अतिक्रमण कारवाई केलेली नाही. त्यामुळे हा प्रश्‍न बिकट झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button