breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महापालिकेचा जलशुध्दीकरण प्रकल्प, चिखलीत दीड हजार वृक्षांवर कु-हाड !

वृक्षतोडीला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मजुंरी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिखली येथील सर्व्हे नंबर 1654 मधील गायरान जागेवरील दीड हजार वृक्षांवर कु-हाड चालविण्यात येणार आहे. ही झाडे तोडण्यास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आज (शनिवारी) मंजुरी दिली. ही वृक्षतोड जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासाठी करण्यात येणार असून वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोडीस ग्रीन सिग्नल दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सभा आज स्थायी समिती सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर, नवनाथ जगताप, संभाजी बारणे, श्याम लांडे, शितल शिंदे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात कृत्रिम पाणी टंचाई सुरु आहे. पवना धरणावरुन बंदिस्त पाईपलाईन प्रस्ताव गुंडाळण्यात आल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे. त्यात आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आंद्रा धरणाचे पाणी चिखलीत आणणार आहेत. तेथील सुमारे 25 एकर गायरान जागेवर जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या जलशुद्धीकरण केंद्रासाठी तब्बल दीड हजार झाडांवर कुर्‍हाड पडणार आहे. झाडांची कत्तल केल्यानंतरच प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

या वृक्षामध्ये सागवान – 83, कडूनिम – 38, चिंच – 22, जारुळ – 12, पेल्टोफोरम – 13, करंज – 18, काचंन – 19, पिंपळ – 22, निलगिरी – 251, काटेरी बाभूळ – 21, खैर – 43, सुबाभूळ – 84, ग्लेरिसिरिया – 1127 अशा प्रकारे 1526 वृक्षावर कु-हाड कोसळणार आहे. त्यातील 227 झाडांचे पुनर्रोपन करण्यात येणार आहे, असे वृक्ष प्राधिकरण समितीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, चिखलीतील बंग वस्तीजवळील 8 हेक्टर गायरान जागेत एकूण 300 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. ही जागा पालिकेच्या ताब्यात आहे. मात्र, त्या ठिकाणी झाडे वाढली आहेत. केंद्राच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी ही झाडे हटवून जागा मोकळी करून देण्याचे पत्र पाणीपुरवठा विभागाने उद्यान विभागाला दिले आहे. जागा मोकळी करून दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. झाडे न हटविल्याने काम सुरू झालेले नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

पवनेचे पाणी पुरेना
पवना धरणातून महापालिका दररोज 480 एमएलडी व एमआयडीसीचे 30 एमएलडी असे एकूण 510 एमएलडी पाणी शहराला पुरेसे ठरत नाही. शहराची वाढती लोकसंख्येमुळे पालिकेने आंद्रा व भामा-आसखेड धरण पाणी योजना आखली आहे. त्यासाठी चिखली येथे जल शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. त्या प्रकल्पाच्या 122 कोटी खर्चास स्थायी समितीने 7 सप्टेंबरला मंजुरी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button