महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 8 लाख कर्करुग्णांवर उपचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई | महाईन्यूज
राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 8 लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. 14 जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी युनिट सुरु करण्यात आले असून आतापर्यंत 2800 रुग्णांना त्याद्वारे उपचार मिळाले आहेत. कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करतानाच उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर वॉरिअर मार्फत 23 जिल्ह्यांमध्ये सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 40 हजार रुग्णांची तपासणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात सध्या अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी युनिट सुरु झालेले आहे. कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील फिशिजीएन व नर्स यांना केमोथेरेपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर ठाणे, रायगड, अहमदनगर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.सर्व सामान्यांना आवाक्याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरु असलेल्या महात्मा जोतीबा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार सुमारे 8 लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सामान्यांना दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.