मला पुन्हा रांचीच्या रूग्णालयात जायचं नाहीये, लालूप्रसाद यांचं एम्सला पत्र
दिल्ली – चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झालेले माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एम्समध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांचा मुक्काम रांचीतील तुरूंगात होता. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रांचीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना एम्समध्ये हलवण्यात आले होते. आता लालूप्रसाद यांची प्रकृती ठीक असून त्यांना पुन्हा रांचीला पाठवण्याची शिफारस एम्सने केली आहे. परंतु, लालूंनी रांचीच्या रूग्णालयात सुविधा नसल्याची तक्रार करत आपल्याला पुन्हा तिथे जायची इच्छा नसल्याचे एम्सला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, लालूंचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एम्सने घाईघाईत हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. एम्सच्या निर्णयामुळे आपल्याला धक्का बसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रांचीच्या तुरूंगात शिक्षा भोगत असताना लालूंना त्रास जाणवू लागल्याने रांचीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात हलवण्यात आले होते. एम्समधील उपचारानंतर लालूंच्या प्रकृतीत सुधारणा झाली. लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली असून त्यांना रांचीच्या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात यावे, अशी शिफारस एम्सने केली.