breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठी रोइंगपटू दत्तू भोकनाळ अर्जुन पुरस्काराने सन्मानित, आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले कौतुक

पिंपरी / महाईन्यूज

देशाचा आघाडीचा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी नौकानयनपटू (रोइंग) महाराष्ट्राचा सुपूत्र दत्तू भोकनाळ याला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी यंदाच्या वर्षीच्या अर्जुन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. खेळातील हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दत्तू भोकनाळ याचा शुक्रवारी (दि. २७) सत्कार करण्यात आला.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील सहा खेळाडूंना यंदाच्या वर्षीचा अर्जुन पुरस्कार जाहीर केला होता. त्यामध्ये नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, घोडेस्वार सुभेदार अजय सावंत, कुस्तीपटू राहुल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव, खो-खोपटू सारिका काळे आणि टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर या सहा जणांचा समावेश आहे. या सर्वांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकताच अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविले आहे.

नौकानयन या अवघड अशा खेळातील योगदानाबद्दल अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांनी दत्तू भोकनाळ याचा शुक्रवारी सत्कार केला. त्याच्या खेळाचे आमदार जगताप यांनी कौतुक केले. तसेच भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दत्तू हा नौकानयन खेळात अर्जुन पुरस्कार मिळविणारा महाराष्ट्रातील पहिला खेळाडू आहे. त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. दत्तूने नौकानयन खेळात दिलेले योगदान या खेळाची आवड असलेल्या अन्य खेळाडूसाठी प्रेरणा देणारी आहे. त्याच्या खेळाकडे पाहून अनेक नवीन खेळाडू स्वतःला घडवतील आणि त्याच्यासारखेच अर्जुन पुरस्कारापर्यंत मजल मारतील, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दत्तू भोकनाळने २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदके, २०१५ एशियन चॅम्पियन शिप एक रौप्य पदक, २०१६ एशियाना आणि ओशियना ऑलिम्पिक पात्रता फेरी रौप्य पदक, २०१६ अमेरिकन नॅशनल चॅम्पियनशिप एक सुवर्ण पदक, २०१६ रिओ ऑलिम्पिक ब्राझील १३ वर्ल्ड रांकिंग, २०१६ साली चीनमध्ये झालेल्या १६ व्या आशियाई रोइंग स्पर्धेत दत्तू भोकनळने रौप्य पदक, २०१६ दक्षिण कोरियातल्या चुंग जू येथील ‘फिसा एशियन ॲन्डओशॅनिक ऑलिंपिक क्वालिफिकेशन’ या नौकानयनाच्या स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सामन्यात रौप्य पदक, २०१६ सालच्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी, भारताकडून रोइंगसाठी पात्र ठरलेला तो एकमेव खेळाडू, २०१७ इनडोर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत एक सुवर्ण पदक, २०१७ सीनियर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये दोन सुवर्ण पदक, २०१७ महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिव छत्रपती पुरस्काराने सन्मान, २०१८ सालच्या इंडोनेशिया मध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्ये एक सुवर्ण पदक पटकावले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button