breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ; आेबीसी समाजाला घेवून रस्त्यावर आंदोलन करु – छगन भुजबळ

पुणे – मराठा हा महाराष्ट्रात सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. ओबीसी समाजाला आरक्षण पवार साहेबांमुळेच मिळाले. मी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात कधीच नव्हतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रस्तावाला मी कधीच विरोध केलेला नाही. जाणीवपूर्वक माझी प्रतिमा मराठा समाजाच्या विरोधात बनवली गेली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी समाजाला घेऊन मी रस्त्यावर यायला तयार आहे. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची आज (रविवार) पुण्यात सांगता सभा झाली. या सभेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, की मी निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही. महाराष्ट्र सदनाचा कंत्राटदार छगन भुजबळ यांनी नेमला नाही आणि शिफारसही केली नाही. दोन महिन्यांपूर्वी मी खूप आजारी होतो. जिवघेणा आजार होता. परंतू आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि पवार साहेबांचे प्रयत्न यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. न्यायदेवतेमुळे तुमच्यासमोर मला बोलता येत आहे. न्यायदेवतेवर माझा विश्वास होता आणि आहे. मी माझी बाजू मांडून निर्दोष सिद्ध केल्याशिवाय हा छगन भुजबळ शांत बसणार नाही. मला न्याय मिळण्यासठी नाशिकला प्रचंड मोठा मोर्चा निघाला. यामध्ये सर्व धर्माचे नागरिक होते. भाजपच्या दिलीप कांबळेही माझी सुटका व्हावी असे म्हणाले. मला भेटायला आलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.

सर्व पक्षांचे नेते भेटून गेले त्यामुळे चर्चांना सुरवात झाली भुजबळ कोठे जाणार, आता राष्ट्रवादीचे स्टेज असल्यामुळे मोकळेपणाने बोलणार आहे. वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही. अजितदादा अडीच वर्षांपूर्वीच माझ्यावर हल्लाबोल झाला. एकाच ठिकाणी सात-सात वेळा धाडी मारण्यात आल्या. मिळाले काही नाही आणि सांगताना बरेच काही सांगण्यात आले, अशी खंत  भुजबळ यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, नोटबंदीमुळे सगळीकडे शांतता आहे, दहशतवाद संपला, कोठेही गोळीबार होत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.  त्याचबरोबर पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट झालीत अशी चार शहरे यांनी सांगावीत, चार जिल्हे सांगावेत ज्यांचा विकास सांगावा. चार गावं हागणदारीमुक्त झालेली दाखवावीत, साखरवाला, दुधवाला, टोमॅटोवाला, कांदावाला रडत आहेत, हे कसले अच्छे दिन असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.आधी आत्महत्या गावात व्हायच्या आता मंत्रालयासमोर होतात. सगळ्यांना अच्छेदिन आलेत, सगळे रडत आहेत, पाकची साखर गोड़ झाली आहे, अशी अवस्था या चार वर्षात झाली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button