मराठमोळ्या पूजा सावंतचे बॉलिवूड पदार्पण; ‘जंगली’ चित्रपटात साकारली भूमिका
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडची वाट धरली आहे. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर या अभिनेत्रींनी मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखविली आहे. याच अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री पूजा सावंतही लवकरच बॉलिवूडवारी करणार आहे. पूजा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विद्युत जामवालसोबत ‘जंगली’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे.
पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिने केलेल्या उत्कृष्ट अभिनयानंतर तिच्या वाट्याला अनेक दर्जेदार भूमिका आल्या.’आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मराठी रसिकांची मन जिंकल्यानंतर ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जंगली या चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. या चित्रपटात ती शंकरा ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.
‘जंगली’ हा चित्रपट माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हस्तीदंतासाठी हत्तींची केली जाणारी शिकार आणि या हत्तींना वाचविण्यासाठी नायकाने केलेला संघर्ष यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबतच नटरंग फेम अभिनेता अतुल कुलकर्णीदेखील झळकणार असून ते हत्तींची शिकार करणाऱ्या शिकारीची भूमिका वठविणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन चक रसेल यांनी केलं असून निर्मिती ‘जंगली’ पिक्चर्सनी केली आहे.