breaking-newsमुंबई

मनोमीलनानंतरही भाजप-सेनेत पाडापाडीचे राजकारण!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप-शिवसेनेत युती झाल्याची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यभर मनोमीलन मेळावे घेण्यात आले; परंतु या मेळाव्यांमुळे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मने मात्र जुळलेली नसल्याचे दिसून येते. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवारांनाच धोबीपछाड देण्यासाठी सरसावल्याचे राज्यात चित्र आहे.

पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनीही यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात काम केले, तर रामटेक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हरिष तुमाने यांना पाडण्यासाठी स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणावर रसद पुरविल्याचे बोलले जात आहे.

मराठवाडय़ातही ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या प्रचारापासून फारकत घेतली आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत, त्या मतदारसंघात शिवसैनिकांनी प्रचारापासून फारकत घेत स्थानिक राजकारण आणि आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकारण लक्षात ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तर प्रसंगी वंचित आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेनेतील एका वरिष्ठ पदाधिका-याने सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सांगली-मिरज, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर येथील लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसैनिकांवर विश्वास ठेवण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना गोंजारण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेनेनेही भाजपवर जास्त भिस्त न ठेवता सरळ राष्ट्रवादीतील काही नेत्यांशी हातमिळवणी केल्याचे भाजपमधील एका पदाधिका-याने सांगितले.

मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी थेटपणे एकमेकांपासून फारकत घेतल्याचे दिसून येत आहे. उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टींच्या विरोधात शिवसैनिकांनी छुपी आघाडी उघडून काँग्रेस उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. दुस-या बाजूला आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवत काँग्रेसचे मालवणीचे आमदार अस्लम शेख काँग्रेस उमेदवारापेक्षा भाजप उमेदवाराला छुपी मदत करत असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनाही सध्या नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असून या भागातील भाजप कार्यकर्ते शेवाळे यांच्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. ईशान्य मुंबईत शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मदत करत असल्याची माहिती पुढे येत आहे

दक्षिण मुंबईत शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना पाडण्यासाठी भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना छुपी मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. उत्तर पश्चिममध्येही विद्यमान भाजप खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात नाराजी असून तेथे प्रिया दत्त यांना शिवसेनेकडून मदतीचा हात मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button