breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीतील ‘दिल…दोस्ती..दुनियादारी’मुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर!

  • माजी आमदार लांडे यांच्या फ्लेक्सवर भाजप आमदार जगताप
  • महापालिका विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांना फ्लेक्सवरुन डावलले
पिंपरी। (विशेष प्रतिनिधी) – भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांचे ‘मित्र प्रेम’ सर्वश्रृत आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव समारंभात लांडे समर्थकांनी उभारलेल्या फ्लेक्सवर प्रमुख उपस्थिती म्हणून जगताप यांचा फोटो झळकत आहे. मात्र, कोणत्याही फ्लेक्सवर विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांना स्थान दिलेले नाही. त्यामुळे आजी-माजी आमदारांच्या ‘दिली…दोस्ती…दुनियादारी’मुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शहरातील राजकारणातील ‘मातब्बर’ अशी ओळख असलेले भोसरीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे आपला वाढदिवस दि.१ जून रोजी साजरा करीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचे निमित्त साधून लांडे समर्थकांनी जोरदार फ्लेक्सबाजी केली आहे. संपूर्ण भोसरी विधानसभा मतदार संघात ‘जननायक’, ‘बिग बॉस’ असे होर्डिंग झळकत आहेत.
वाढदिवसानिमत्त आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रथमच भोसरीत येणार आहेत. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता ‘गौरव समारंभ’ आयोजित केला आहे. जयंत पाटील यांच्या हस्ते लांडे यांचा सन्मान करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची उपस्थिती राहणार आहे.  तसे फ्लेक्सही उभारण्यात आले आहेत. फ्लेक्सवर आयोजक म्हणून लांडे यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अजित गव्‍हाणे यांच्या नावाचा उल्लेख आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव समारंभात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुकारण्याचा मानस लांडे समर्थकांचा आहे. पण, या संपूर्ण ‘कॅम्पेनिंग’मध्ये महापालिकेतील नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना पूर्णपणे बगल दिली आहे. वास्तविक, साने यांना विरोधी पक्ष नेतेपद देताना पक्ष देईल त्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत साथ द्यावी लागेल, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. मात्र, लांडे समर्थकांना साने यांच्या भूमिकेबाबत साशंकता आहे. त्यामुळे आगामी काळात लांडे आणि साने यांच्यात दरी वाढणार असून, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
——
आमदार लांडगे-जगताप नवा वाद…
भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांच्यातील दुरावा वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात लांडगे यांचे कट्टर समर्थक महापौर नितीन काळजे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाअंतर्गत विकास कामांच्या भूमीपूजनाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जगताप यांना कार्यक्रमात डावलले होते. त्यामुळे जगताप यांनी महापौर काळजे यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदार संघातील जाहीर कार्यक्रमात आमदार लांडगे यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या माजी आमदार लांडे यांच्या कार्यक्रमाला आमदार जगताप यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली आहे. त्यामुळे आमदार लांडगे समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, आगामी काळात आमदार जगताप आणि लांडगे यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button