breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीच्या ‘कुलगुरूं’ची शिष्यावर भडास, म्हणाले ‘जगताप शहराला उध्वस्त करतोय’

  • पत्रकार परिषदेत माजी आमदार विलास लांडे यांची टिका
  • आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यावरही व्यक्त केली नाराजी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी त्याच-त्या ठेकेदारांना कामे देण्याचा सपाटा लावला आहे. त्यांना आवर घालणा-या नेत्यांच्या झोळ्या भरत असल्यामुळे ते चक्कार शब्द बोलायला तयार नाहीत. नागरिकांच्या कराचे पैसे विकास कामांवर खर्च केले जात असताना नागरिकांच्या हिताचा विचार होताना दिसत नाही. हे सर्व जगतापच्या इशा-यावर सुरू आहे. आमदार जगताप शहराला ‘उध्वस्त’ केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत भोसरीचे राजकीय कुलगुरू माजी आमदार विलास लांडे यांनी आपले शिष्य आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कर्तव्यदक्षतेची समिक्षा केली.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 30) भोसरीत आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेची माहिती मंडळाचे सचिव एड. संदीप कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी आमदार विलास लांडे यांनी सत्ताधारी भाजपच्या दोन्ही आमदारांच्या चालू कारभाराचा समाचार घेतला. माजी आमदार विलास लांडे यांच्या कार्यक्रमात भोसरी हे राजकीय विद्यापीठ असून विलास लांडे कुलगुरू आहेत, त्यामुळे या विद्यापीठातून मला राजकीय धडे गिरवायला मिळतात, अशी स्पष्टोक्ती आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती. तेव्हा लांडे शहरात चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, आज अचानक कुलगुरू लांडे आपल्या शिष्यावर चिडल्याचे दिसले. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिष्य जगताप यांच्यावर गृहपाठ व्यवस्थित करत नसल्याने राग व्यक्त केला, असेच म्हणावे लागेल.

लांडे म्हणाले की, शहरातील विकास कामांच्या निविदा काढताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः लक्ष घालून कमी दराच्या निविदा भरणा-याला प्राधान्य देत होते. आमच्या कार्यकाळामध्ये कोणावर पक्षपातीपणा झाला नाही. नागरिकांचे हित समोर ठेवून दादांनी विकासाला प्राधान्य दिले. मात्र, सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजला आहे. त्याच-त्या ठेकेदाराला कामे देण्याचा सपाटा लावला आहे. आयुक्तांच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपचे नेते मलिदा लाटत सुटले आहेत. त्यांच्या झोळ्या भरत असल्यामुळे शहराच्या विकासाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. आयुक्त भ्रष्ट असल्यामुळे थेट नगरपूरला पिंपरीची मालमत्ता पोहचती होत आहे. नेत्यांना सक्षम आयुक्त नको आहेत, म्हणून हार्डीकरांसारखे आयुक्त पोसले जात आहेत. तेव्हा डॉ. श्रीकर परदेशी यांची आडचण होत असल्यामुळेच आमदार जगतापाने काड्या करून त्यांची बदली होण्यास भाग पाडले. नागरिकांच्या कराचे पैसे विकासात खर्च होताना नागरिकांच्या हिताचा विचार कोणी करत असल्याचे दिसत नाही. जगताप शहराचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही, अशी भडास लांडे यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, प्रवक्ता फजल शेख, माजी नगरसेविका शमीम पठाण, युवती अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button