breaking-newsमुंबई

भुयारी मार्ग पाहिजे तर जमीन द्या

  • एमएमआरडीएचा बीपीटीला प्रस्ताव

‘वडाळा ते जनरल पोस्ट ऑफिस’ (जीपीओ) या मेट्रो -४ च्या विस्तारित मार्गिकेमधील ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या (बीपीटी) जमिनीवरून जाणारी मार्गिका भुयारी करण्याची मागणी पोर्ट ट्रस्टने ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’कडे (एमएमआरडीए) केली होती. त्यावर भुयारी मार्गिकेला लागणारा संपूर्ण बांधकाम खर्च पोर्ट ट्रस्टने द्यावा, अशी भूमिका ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतली आहे. मात्र भुयारी मार्गिकेचा खर्च देण्यास ट्रस्ट तयार नसल्यास त्या मोबदल्याची दक्षिण मुंबईतील एखादी जमीन त्यांच्याकडून मागण्याचा विचारात ‘एमएमआरडीए’ प्रशासन आहे. त्यामुळे भुयारीकरणाचा खर्च उचलण्यास बीपीटी प्रशासन तयार न झाल्यास दक्षिण मुंबईसारख्या मोक्याच्या ठिकाणावरील एखादी जमीन त्यांना ‘एमएमआरडीए’ प्रशासनाला द्यावी लागण्याची शक्यता आहे.

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या ३२ किलोमीटर मेट्रो-४ मार्गिकेचा आठ किलोमीटरचा विस्तारित मार्ग ‘एमएमआरडीए’ प्रशासनाकडून उभारण्यात येणार आहे. वडाळा ते जीपीओदरम्यान उभारण्यात येणाऱ्या या विस्तारित मार्गिकेचा अपेक्षित खर्च २,४०० कोटी रुपये आहे. आठ किलोमीटरची ही संपूर्ण मार्गिका उन्नत स्वरूपाची असून त्यातील दोन किलोमीटरची मार्गिका बीपीटी प्रशासनाची मालकी असणाऱ्या जमिनीवरून प्रास्तावित आहे. या जमिनीवर बीपीटी प्रशासन ‘इस्टन सीफ्रन्ट’ प्रकल्पाअंतर्गत विकासकाम करणार आहे. त्यामुळे मालकी जागेचा मुद्दा अधोरेखित करून दोन किमीची उन्नत मार्गिका भुयारी करण्याची मागणी बीपीटीने प्राधिकरणाकडे केली होती. मात्र उन्नत मार्गिकेमधील एक किलोमीटरचा पट्टा बांधण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. याउलट हाच पट्टा भुयारी केल्यास त्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये एवढा वाढीव खर्च होईल.त्यामुळे भुयारी मार्गिकेसाठी होणारा दोन हजार कोटी रुपयांचा खर्च बीपीटी प्रशासनाने द्यावा, अशी भूमिका एमएमआरडीएने घेतली आहे. मात्र हा खर्च देण्यास बीपीटी प्रशासनाने नकार दर्शवल्यास त्यांच्याकडून दोन हजार कोटी रुपये किमतीची जमीन घेण्याचा विचार एमएमआरडीए करत आहे. बीपीटीकडे दक्षिण मुंबईत मालकीची जमीन आहे. त्यामुळे ट्रस्टला भुयारी मार्गिकेसाठी लागणारा खर्च देणे न परवडणारे असल्यास त्यांच्याकडून खर्चाच्या मोबदल्याची दक्षिण मुंबईतील मालकीची जमीन मागण्याचा विचार असल्याची माहिती एमएमआरडीएमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button