breaking-newsपुणे

भिडे, एकबोटेंना वाचविण्यासाठी ढवळेंना अटक

  • समविचारी संस्थांची पत्रकार परिषद : लवकरच पुढील दिशा 

पुणे – मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी निष्पाप सुधीर ढवळेंना अटक केली आहे. पोलिसांच्या परवानगीने एल्गार परिषद झाली आहे, काही आक्षेपार्ह वाटत असते तर त्याचवेळी गुन्हा दाखल करून अटक का केली नाही, असा सवाल समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

कबीर कला मंचचे रमेश गायचोर, सागर गोरखे, यल्गार परिषदेच्या संयोजन समितीतील ज्योती जगताप, आकाश साबळे, इब्राहिम खान, महाराष्ट्र कामगार संघटनेचे सिद्धार्थ दिवे, किशोर कांबळे यांनी पत्रकार परिषद घेतली.तक्रारदार तुषार दामदुडे यांनी काही दिवसानंतर तक्रार का दाखल केली? त्यांना परिषदेमुळे त्रास झाला असेल आणि भावना दुखावल्या गेल्या असतील, तर तक्रार द्यायला वेळ का लागला? असेही प्रश्‍न या प्रतिनिधींनी उपस्थित केले.

दंगल घडवणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी आणि बाधित कुटुंबांना न्याय मिळावा, यासाठी सरकारने समिती नेमली आहे. समितीच्या कामाला एक महिना पूर्ण होण्याआधीच ढवळेंना अटक केली आहे. मुख्यमंत्री हे गृहमंत्रीदेखील आहेत. या प्रकारामुळे पुण्याचे पोलीस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत, असे आम्हाला वाटते, असे या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
भीमा कोरेगावची दंगल दहशतवाद्यांनी घडवली, असा माजी खासदार प्रदीप रावत यांच्या अध्यक्षतेखालील सत्यशोधन समितीने अहवाल तयार केला होता. याआधारे ढवळेंना अटक केल्याचेही या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी ढवळेंना अटक केल्याचा आरोपही करण्यात आला.

आंबेडकरी चळवळीतील लोकांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले असून, सरकार आणि मुख्यमंत्री यांनी बहुजन चळवळीची फसवणूक केली आहे. दोन दिवसांत आंबेडकरवांदी आणि पुरोगामी, परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून पुढील दिशा निश्‍चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

…असे आहे कोरेगाव भीमा-कोरेगाव प्रकरण
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदी सहभागी झाले होते. परिषदेच्या सुरूवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना चेतवल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

…अशी झाली दंगल 
पुणे-नगर महामार्गावरील भीमा कोरेगावमध्ये दि. 1 जानेवारी 2018 रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झाले. सणसवाडीतील वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले आणि त्यातून अनेक वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button