breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारतात 5 अब्ज डॉलर जमा केल्याचा शरीफ यांच्यावर आरोप

  • पाकिस्तानच्या “नॅशनल अकाउंटॅबिलीटी ब्युरो’ने दिले चौकशीचे आदेश

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानकाळामध्ये 4.9 अब्ज डॉलर भारतात जमा केल्याचा आरोप व्हायला लागला आहे. प्रसिद्धीमाध्यमांकडून झालेल्या या आरोपांची पाकमधील “नॅशनल अकाउंटॅबिलीटी ब्युरो’ने दखल घेतली असून या प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.

“नॅशनल अकाउंटॅबिलीटी ब्युरो’चे अध्यक्ष न्या. (निवृत्त) जावेद इक्‍बाल यांनी शरीफ यांच्यावरच्या या कथित आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या वृत्तातल्या उल्लेखानुसार या गैरव्यवहाराची नोंद जागतिक बॅंकेच्या “मायग्रेशन ऍन्ड रिमिटन्स बुक 2016’मध्ये असल्याचे या निवेदनामध्ये म्हटले आहे. मात्र प्रसिद्धी माध्यमांच्या वृत्तातील अन्य तपशीलाची या निवेदनामध्ये नोंद नाही. पाकिस्तानातील “जिओ टिव्ही’ ने सर्वप्रथम या प्रकरणाला प्रकाशात आणले होते.

शरीफ यांनी 4.9 अब्ज डॉलर इतकी प्रचंड रक्कम भारतीय वित्त मंत्रालयाकडे जमा केली होती. त्यानंतर भारतीय विदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये अचानक मोठी वाढ झाली होती. तर पाकिस्तानमधील विदेशी चलन अचानक घटले होते, असे “एनएबी’च्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

शरीफ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तीन प्रकरणे सुरू आहेत. पनामा पेपर्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भ्रष्टाचाराच्या या तिन्ही प्रकरणांवर “एनएबी’समोर सुनावणी सुरू आहे. लाहोरमधील जती उमरा परिसरातील आपल्या निवासस्थानापर्यंतचा रस्त्याचे बेकायदेशीरपणे रुंदीकरण केल्याबद्दलही “एनएबी’कडून शरीफ यांची चौकशी सुरू आहे. भारतात पैसे जमा केल्याबद्दल जर खटला चालवला गेला तर “एनएबी’ तपासत असलेले शरीफ यांच्याविरोधातले हे पाचवे प्रकरण ठरेल. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना गेल्या वर्षी पंतप्रधान राहण्यास अपात्र ठरवले. त्यामुळे शरीफ यांना राजीनामा द्यायला लागला होता. आपल्याविरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे शरीफ यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना दीर्घ मुदतीचा तुरुंगवास होण्याची शक्‍यता आहे.

कुटुंबियांवरील खटल्याच्या सुनावणीसाठी मुदतवाढीची मागणी 
शरीफ यांच्या कुटुंबियांविरोधात सुरू असलेले खटले संपवण्यासाठी “एनएबी’च्या न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाकडे अधिक मुदतीची मागणी केली आहे. “एनएबी’ने दाखल केलेल्या संदर्भांच्या आधारे शरीफ यांच्या कुटुंबियांविरोधातही आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खटला सुरू आहे. या खटल्याला यापूर्वी एकदा दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र आणखी मुदत मिळावी यासाठी “एनएबी’चे न्यायाधीश मुहम्मद बशीर यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले आहे. पूर्वी दिलेली 2 महिन्यांची मुदत संपत आली तरीही हा खाटला संपण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. अल अझिझिया स्टील मिल आणि फ्लॅगशीप इन्व्हेस्टमेटशी संबंधित प्रकरणी अद्याप सुनावणीही सुरू झाली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button