breaking-newsराष्ट्रिय

भारतातील ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ विमानांच्या सुरक्षेचा आढावा घेणार DGCA

इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून केनियातील नैरोबी येथे जात असलेले ‘इथिओपियन एअरलाइन्स’चे ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ हे विमानाला काल (१० मार्च २०१९) कोसळले. या अपघातामध्ये विमानातील १५७ प्रवाशांसहीत ८ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार भारतीय प्रवाशांचाही समावेश आहे. मागील काही महिन्यामध्ये ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या विमानाचा झालेला हा दुसरा अपघात असल्याने अनेक देशांनी या विमानांच्या उड्डाणांसंदर्भात महत्वाचे निर्णय कालच्या अपघातानंतर घेतले आहेत. भारतातील हवाई उड्डाणांवर नियंत्रण ठेवणाऱ्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारी देशात ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकाराची विमाने वापरणाऱ्या ‘जेट एअरवेज’ आणि ‘स्पाइसजेट’ या विमान कंपन्यांशी चर्चा करणार आहे. या विमानांच्या सुरक्षेसंदर्भात दोन्ही कंपन्यांकडून माहिती घेण्यात येणार असल्याचे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी एका वेबसाईटशी बोलताना दिली आहे.

अपघातानंतर इथिओपियन एअरलाइन्सने याप्रकरणी एक निवेदन प्रसिद्ध केले. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकाराच्या विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता अदिस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. परंतु, ८.४४ वाजता त्याचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. त्यानंतर या विमानाची अपघात झाल्याचे समजल्याचे कंपनीने म्हटले आहे.

जगभरातील हवाई उड्डाण क्षेत्राला हदरवून सोडणाऱ्या या अपघातानंतर चीनने तातडीने त्यांच्या देशातील ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकाराच्या विमानांचे उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्येही जेट एअरवेज आणि स्पाइसजेट या दोन कंपन्या ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकारची विमाने प्रवासी वाहतूकीसाठी वापरतात. स्पाइसजेटने यासंदर्भात ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या माहितीनुसार ते सध्या देशात १३ ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकाराची विमाने वापरत आहेत. यासंदर्भात जेट एअरवेजने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

‘बोईंग’ने इथिओपियातील अपघातानंतर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनामध्ये संबंधित अपघाताच्या चौकशीसाटी इथिओपिया एअरलाइन्सला शक्य ती मदत करण्याची तयारी ‘बोईंग’ दर्शवली आहे. आमच्या तज्ञांचे एक पथक विमानचा अपघात झाला त्या ठिकाणाला (क्रॅश साईटला) भेट देणार आहे. इथिओपियन अधिकारी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांच्या गट एकत्रितपणे या अपघातामागील कारणे शोधण्यासाठी काम करतील असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

रविवारी झालेला अपघात हा मागील काही महिन्यांमध्ये ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकाराची विमानाचा समावेश असलेला दुसरा मोठा अपघात आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ताजवळच्या समुद्रामध्ये ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकाराचे लायन एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या १३ व्या मिनिटांला झालेल्या या अपघातामध्ये विमानातील सर्व १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकन कंपनी असणाऱ्या ‘बोईंग’ची निर्मिती असलेले ‘मॅक्स ८’ हे सर्वाधिक विक्री झालेले ‘बोईंग ७३७’ प्रकारचे विमान आहे. ‘बोईंग ७३७’ विमाने १९६७ पासून कार्यरत आहेत. जगभरामध्ये सध्या ३५० हून अधिक ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकाराची विमाने कार्यरत आहेत. तर २०१७ पासून कंपनीला पाच हजारहून अधिक ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ विमानांची ऑर्डर मिळाली आहे. एकीकडे कंपनीला या विमानामुळे फायदा होत असतानाच कंपनी या विमानातील कंट्रोल सिस्टीमसंदर्भातील सॉफ्टवेअरसंदर्भातील अडचणीवर माहिती देत नसल्याचा आरोप वारंवार होत आहे. या टिकेला उत्तर देताना बोईंगने ‘७३७ मॅक्स ८’ हे विमान हे सध्या उड्डाण घेणाऱ्या विमानांपैकी सर्वात सुरक्षित विमान असल्याचा दावा केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button