पिंपरी / चिंचवड

भाजप राष्ट्रीय बैठकीच्या वेळी विरोधक करणार उपोषण

– महापालिकेत भाजपची मनमानी सुरू असल्याचा आरोप
पिंपरी–  शेतकरी कर्जमुक्ती, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, शास्तीकर माफी यासाह जनतेला दिलेल्या विविध आश्वासनांची मुख्यमंत्री व सत्तारूढ भाजपला आठवण करून देण्यासाठी चिंचवड येथे 26 व 27 एप्रिलला होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या वेळी दोन दिवसांचे उपोषण करण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत आज घेण्यात आला.

बैठकीस स्वराज अभियानचे मानव कांबळे, शिवसेनेचे मारुती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे फजल शेख, विजय लोखंडे, आनंदा यादव, भारिप बहुजन महासंघाचे देवेंद्र तायडे, एआयएमआयआयचे सम्राट साळवे, शब्बीर शेख, काँग्रेसचे मनोज कांबळे, आरपीआय कवाडे गटाचे रामदास ताटे, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, शेतकरी कामगार पक्षाचे हरीश मोरे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नकुल भोईर, भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे अमित कांबळे, ओबीसी संघर्ष समितीचे विशाल जाधव आदी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे व मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनीही या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पदाधिकारी मात्र चर्चेनंतर याबाबतची भूमिका जाहीर करणार आहेत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या निर्णयाबाबत स्पष्टता यावी, सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा, मराठी, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, शहरातील गोरगरीबांना किमान शासकीय व महापालिकेच्या योजनेअंतर्गत किमान 500 चौरसफुटांची घरे मिळावीत, न्यायालयात जाऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थींना घरांपासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी त्याबाबत जाहीर खुलासा करावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री, केंद्रातील व राज्यातील भाजपचे मंत्री तसेच सर्वच वरिष्ठ नेते चिंचवडला येणार आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जनतेला विविध आश्वासने दिली होती. त्यावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना सत्ता दिली आहे, मात्र त्या आश्वासनांचा भाजपला विसर पडल्याने, त्याची आठवण करून देण्यासाठी बैठकीच्या ठिकाणासमोर दोन दिवसांचे उपोषण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button