breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भाजप मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मौन का?

अशोक चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई : ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर प्रकरणावर बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच सरकारमधील निम्म्याहून अधिक भाजपच्या मंत्र्यांवरील घोटाळ्याच्या आरोपांवर मौन धारण का केले आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

राज्यात दुष्काळी स्थिती गंभीर आहे, गेल्या काही वर्षांत १७ हजार शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई नाही, सनातन संस्थेचे बॉम्ब बनविण्याचे कारखाने सापडले, तरीही मुख्यमंत्री त्यावर बोलत नाहीत, असा हल्लाबोल चव्हाण यांनी केला. देशात सध्या राजकीय वादळ उठविणाऱ्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर आरोपाच्या फैरी झाडल्या. अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. ऑगस्टाप्रकरणी मुख्यमंत्री व भाजपचे सर्वच नेते खोटे आरोप करीत आहेत, काँग्रेसला व काँग्रेसच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा त्यांचा हा कट आहे असा आरोप त्यांनी केला.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी व भाजपच्या नेत्यांनी केलेले आरोप करणे म्हणजे चोरांच्या उलटय़ा बोंबा असा हा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने खोटा प्रचार करण्यासाठी सह्य़ाद्री या सरकारी अतिथीगृहाचा वापर करणे कितपत योग्य आहे, असा सवालही चव्हाण यांनी केला.

ऑगस्टा प्रकरणातील कागदपत्रात सोनिया गांधी यांचे नाव असल्याचा मुख्यमंत्र्यांनी आरोप केला. सहारा-बिर्ला डायरीत अनेक भाजप नेत्यांची नावे होती, त्याबाबत फडणवीस बोलले असते तर बरे झाले असते, असे ते म्हणाले.  ऑगस्टाप्रकरणी चव्हाण यांनी काँग्रेसची बाजूही  मांडली. यूपीए सरकारच्या काळातच ऑगस्टा प्रकरणात काय-काय कारवाई केली याची महिती त्यांनी दिली. ऑगस्टा व तिच्या पालक कंपनी फिनमेकेनिकाला हेलिकॉप्टर खरेदीचे कंत्राट दिले होते. मात्र त्याबद्दल माध्यमांमधून काही शंका उपस्थित करण्यात आली, त्याची दखल घेऊन यूपीए सरकारनेच सीबीआय चौकशीचे आदेश दिले. पुढे त्या कंपनीची बँकेतील २४० कोटी रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले. ऑगस्टाला १६२० कोटी रुपये दिले होते, मात्र त्यांचे कंत्राट रद्द केल्यानंतर त्यांच्याकडून २९५४ कोटी म्हणजे दुप्पट रक्कम वसूल केली. काँग्रेस सरकारने इटलीच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता तो जिंकला, असे त्यांनी सांगितले.

‘ऑगस्टा’ला काळ्या यादीतून का वगळले?

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर ऑगस्टा वेस्टलॅण्ड व फिनमेकेनिकाला काळ्या यादीतून का वगळण्यात आले, काळ्या यादीतील कंपन्यांना मेक इन इंडियात कसे सहभागी करून घेतले, या कंपनीला ११९ सैनिकी हेलिकॉप्टर उत्पादन करण्याची व १०० नौसैनिकांसाठी हेलिकॉप्टरची बोली लावण्याची परवानगी कशी दिली, ऑगस्टाविरोधीतील खटले हारल्यानंतर न्यायालयात अपील का केले नाही, याची उत्तरे देवेंद्र फडणवीस यांनी द्यावीत किंवा त्यांना माहिती नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button