भाजप आमदार कर्डिले यांना अटक
अहमदनगर : शिवसैनिकांच्या हत्याप्रकरणात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सत्ताधारी आमदार कर्डिले यांना घरात जाऊन ताब्यात घेतलं.
आमदार शिवाजी कर्डिले यापूर्वी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे आहेत, तर कोतकर कुटुंबीयांचे व्याही आहेत. कर्डिलेंवर हत्येचा कट रचणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड असे दोन गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकीदरम्यान राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं.
याप्रकरणात भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप या तीन आमदारांवर हत्याकांडाचा आरोप आहे. आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.