breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या हुकूमशाही कारभाराचा विरोधकांनी केला निषेध

  • कार्यक्रम पत्रिकेत भाजपकडून प्रोटोकॉलचे उल्लंघन
  • विरोधकांची नावे न छापल्याने महापालिकेत संताप

 

पिंपरी – महापालिकेच्या कल्याणकारी योजनेंतर्गत पंडीत दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग अर्थसहाय अर्ज वितरण शुभारंभ कार्यक्रमात केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेद्वारे कर्ज वितरण सोहळा घेतला. त्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापल्या. मात्र, पत्रिकेत नावे छापताना भाजपने प्रोटोकॉल पाळला नाही. महापालिकेत भाजप हुकूमशाही पध्दतीने कारभार चालवित आहे. या हुकूमशाही कारभाराचा राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेने एकत्रीत पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदविला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी अर्थसहाय योजना राबविली जात आहे. नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत पंडीत दिनदयाळ उपाध्याय दिव्यांग अर्थसहाय अर्ज वितरण शुभारंभ शुक्रवारी (दि. 25) घेण्यात आला. या कार्यक्रमात भाजपच्या पदाधिका-यांनी सामाजिक अधिकारिता शिबिर या नावाखाली मुद्रा योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांतून कर्ज वितरण मेळावाही घेतला. मात्र, कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेता दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांची नावे छापली नाहीत. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील नाव छापले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपच्या हुकूमशाही कारभारावर शुक्रवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेऊन जोरदार टिका केली.

दत्ता साने म्हणाले की, भाजपचे स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी यापुढे कोणत्याही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली जाणार नाही, असे जाहिर केले होते. तरीही, या कार्यक्रमाची पत्रिका छापली. त्यामध्ये स्थानिक नेत्यांची नावे टाकताना भाजपने प्रोटोकॉल पाळला नाही. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम पालिकेचा आहे. पालिकेच्या जागेत कार्यक्रम घेऊन खर्च सुध्दा पालिकेनेच केला आहे. तरीही, भाजपच्या पदाधिका-यांनी उद्दमपणे विरोधकांची नावे पत्रिकेत छापली नाहीत. त्यामुळे भाजपच्या हुकूमशाही कारभाराचा जाहिर निषेध करत आहे, अशा शब्दांत साने यांनी संताप व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत सेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button