breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपचे 16 नगरसेवक बंडखोरीच्या तयारीत, एका नगरसेविकेने अजितदादांची घेतली भेट

  • स्थायी समिती सदस्य निवडीवरून तापले वातावरण
  • नाराज नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात ठोकला शड्डू

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपूष्टात आला आहे. उद्या होणा-या स्थायी समिती सभेत नवीन सदस्यांची निवड होणार आहे. नवीन सदस्यांना अवघे एकच वर्ष स्थायीत काम करायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांना स्थायीत संधी मिळण्याची आपेक्षा लागली आहे. संधी न मिळाल्यास भाजपचे 15 ते 16 नगरसेवक बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यातील एका नगरसेविकेने शहरातील सत्ताधा-यांच्या कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याचे समजते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठ्या प्रमाणात गळती लागण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीची सदस्यसंख्या 16 आहे. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादीचे 4, शिवसेना 1 आणि अपक्ष आघाडीचा एक असे संख्याबळ आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर पाच वर्षात स्थायी समितीमध्ये प्रत्येक नगरसेवकाला संधी देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. पहिल्या वर्षात स्थायीच्या 10 आणि अपक्ष एक अशा 11 सदस्यांचे भाजपकडून राजीनामे घेतले होते. दरम्यान, दुस-या वर्षात तसे न करता सदस्यांना दोन वर्ष काम करण्याची संधी देण्यात आली. आता शेवटच्या वर्षात प्रथम वर्षाप्रमाणे सर्वांचे राजीनामे घेण्याची शक्कल पक्षाच्या धुरीणांनी लढविली आहे. ऐनवेळची बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या वर्षामध्ये नाराजांना देखील संधी देण्याचा विचार केला जात आहे. स्थायीचे हुकीमी एक्का मानले जाणारे सभापती संतोष लोंढे, सदस्या आरती चोंधे, केवळ स्वाक्षरीसाठी उपस्थिती लावणारे शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीला संपतो आहे. तर, भाजपाचे नगरसेवक शशिकांत कदम, अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. नाराज नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यास या सहा नगरसेवकांना राजीनामे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांना एकच वर्ष काम करायला मिळणार आहे.

दोन्ही आमदारांपुढे पेच

अनेक नगरसेवकांना मागणी करून देखील स्थायी समितीमध्ये संधी मिळाली नाही. तर, काहींना वेगळ्या गटाचा असल्याचा शिक्का मारून त्यांना चार वर्षे बाजुला ठेवण्यात आले. आता शेवटचे वर्ष राहिल्याने त्यांना शहरातील पक्षाच्या नेतृत्वाकडून संधी मिळण्याची आपेक्षा लागली आहे. यावेळी संधी मिळाली नाही, तर पंधरा ते सोळा नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात बंडखोरी करण्याची तयारी केली आहे. त्यातील चिंचवडच्या एका नगरसेविकेने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन पूर्वनियोजन केल्याची माहिती समोर आली आहे. पंधरा ते सोळा नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्यात भाजपच्या पदाधिका-यांना यश येईलच असे नाही. कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नकार द्यायचा, याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षाला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. नाराज नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहेत, अशी पदाधिका-यांत चर्चा सुरू आहे. त्याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button