breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती?

पिंपरी – भाजपने चार वर्ष पुर्ण केल्याच्यानिमित्त शहर भाजपकडून आयोजित पत्रकार परिषदेला चक्क शहराध्यक्ष तथा लक्ष्मण जगताप आणि महापौर नितीन काळजे यांनीच दांडी मारली. वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झालेली जाहिरात खासदार अमर साबळे यांनी वाचून दाखवली. मात्र, शहरातील प्रलंबित प्रश्‍न व निवडणूक पूर्व आश्‍वासनांबाबत बोलताना खासदारांची भंबेरी उडाल्याचे पहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा 4 वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे. यानिमित्त सरकारच्या विविध योजना व कामांबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. खासदार साबळे यांच्यासह भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, बाबू नायर, प्रमोद निसळ आदी उपस्थित होते. मात्र, शहराध्यक्ष जगताप यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. महापौर काळजे यांनीही दांडी मारली. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता एका पदाधिकाऱ्याने महापौर येवून गेल्याचे सांगितले. तर दुसऱ्या पदाधिकाऱ्याने महापौरांचा नियोजित कार्यक्रम असल्याचे सांगितले. त्यामुळे महापौरांच्या अनुपस्थितीबद्दल होत असलेली सारवासारव लपून राहिली नाही.

मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल खासदार साबळे घडाघडा बोलतील, असे अपेक्षित होते. मात्र, वर्तमान पत्रात चार वर्ष पुर्तीच्या प्रसिध्द झालेल्या जाहिरातीच त्यांनी वाचून दाखवल्या. स्थानिक प्रश्‍नांबाबत त्यांना छेडले असता त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा उत्तरे देताना गोंधळ उडाला. मोदी सरकारने अनेक उपलब्धी परिपूर्ण व लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झालेले नाहीत. पंतप्रधानांनी उद्योग, व्यापार आणि अर्थ व्यवस्थेबाबत मोठा कार्यक्रम हाती घेतल्याने या दोन्ही क्षेत्राना आलेली मरगळ दूर झाली आहे. त्यानंतर काही वर्षे प्रलंबित असलेला वस्तू व सेवा कर मोदींनी आणला. त्यामुळे उद्योग क्षेत्राची परिस्थिती सुधारली, अशी मोदी स्तुती सुमने यावेळी उधळण्यात आली.

‘त्या’ योजनांची माहितीच नाही…
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मेट्रो, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, दिव्यांगांना क्रेंद्र शासनाची मदत, मुद्रा लोन, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गरिबांना परवडणारी घरे, विमा कवच, स्कील इंडियाव्दारे युवकांना प्रशिक्षण, खेळाडूंसाठी अर्थसहाय्य, जन धन आणि जन सुरक्षा, स्वच्छ भारत योजना, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना, मिशन इंद्रधनुष्यव्दारे मुलांचे लसीकरण, सुकन्या समृध्दी योजना आदी योजना केंद्र शासनाव्दारे मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्याचा दावा खासदार अमर साबळे यांनी केला. मात्र, यातील जवळपास निम्म्या योजना शहरवासियांना माहिती देखील नाहीत. खेळाडूंसाठी अर्थसहाय्य, विमा कवच, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना, मिशन इंद्रधनुष्यव्दारे मुलांचे लसीकरण, सुकन्या समृध्दी योजना शहरात कधी राबवल्या असा सवाल शहरवासिय करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button