breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

बोफोर्स प्रकरण…भारतीय राजकारणातील उलथापालथ आणि काँग्रेसविरोधकांचे कारस्थान!

देशाच्या लोकशाही इतिहासात इंदिरापर्वानंतर भारतीय राजकारणाला वेगळे वळण लावणाऱ्या महत्त्वाच्या घटना म्हणून राम मंदिर उभारण्याची चळवळ, मंडल आयोगाची अंमलबजावणी याकडे पाहिले जाते. बोफोर्स प्रकरण हे त्याच मालिकेतील आहे. अमेरिकेत ‘वॉटरगेट’ हा शब्द ज्याप्रमाणे राजकीय घोटाळ्यांशी जोडला गेलेला आहे, त्याचप्रमाणे भारतात बोफोर्स हा घोटाळ्याचा प्रतिशब्द बनलेला आहे. या प्रकरणामुळे देशातील काँग्रेसची सत्ता गेली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ‘बोफोर्स’ प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

***

बोफोर्सप्रकरणी सीबीआयने १९९९ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात मुख्य आरोपी म्हणून ज्यांचे नाव होते आणि त्यानंतर दहा वर्षांनी सीबीआयनेच ज्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले, ते इटालियन उद्योगपती ओटोव्हिओ क्वात्रोची आहेत. क्वात्रोची यांच्यावरील खटला मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ‘सीबीआय’ने केली होती.

‘सीबीआय’चे म्हणणे असे होते, की क्वात्रोची यांच्याविरुद्ध प्रदीर्घ काळ खटला सुरू आहे. परंतु, त्या दरम्यान जी काही तथ्ये समोर आली आहेत, त्यावरून त्यांच्याविरुद्ध खटला चालवणे अन्यायपूर्ण आहे. शिवाय त्यांना परदेशातून परत आणण्यातही ‘सीबीआय’ला अपयश आले आहे. तेव्हा २०११मध्ये सर्वोच्च न्यायालयाने क्वात्रोची यांच्यावरील खटला रद्दबातल ठरवला. याचा अर्थ क्वात्रोची पुराव्याअभावी निर्दोष होते असा होतो. याचा दुसरा अर्थ सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते, त्यामुळे त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आले असा होतो. आणि मग बोफोर्स घोटाळा म्हणजे केवळ राजकीय सूडाचे, चिखलफेकीचे कारस्थान म्हणूनच उरते. या प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

***

राजीव गांधी यांचाही दलालांना विरोध होता…

भारत सरकारने स्वीडनच्या एबी बोफोर्स कंपनीशी ४१० हॉवित्झर तोफा खरेदीचा एक हजार ५०० कोटींचा करार केला. त्यासाठी कंपनीने ६४ कोटी रुपयांची लाच दिली, असा आरोप आहे. हा करार २४ मार्च १९८६ ला झाला. त्याआधी जानेवारीमध्ये स्वीडनचे पंतप्रधान ओलॉफ पाम आणि राजीव गांधी यांच्यात एक करार झाला होता. लष्करी सामग्री खरेदीच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ असणार नाही. कोणालाही कमिशन, म्हणजेच वेगळ्या शब्दांत लाच दिली जाणार नाही असा तो करार होता. शस्त्रास्त्र दलालांना राजीव गांधी आणि ओलॉफ पाम यांनी दिलेले हे आव्हानच होते. यानंतर काही दिवसांतच पाम यांची हत्या झाली आणि १९९१मध्ये एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली. त्या हत्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र दलाल अदनान खशोगी याचा मित्र चंद्रास्वामी यांच्याकडे बोट दाखविण्यात आले होते, हा केवळ योगायोग म्हणून सोडून दिला, तरी पाम यांच्या हत्येनंतर या व्यवहारात अचानक मध्यस्थ कोठून उपटला हा प्रश्न उभा राहतोच. सॅम्प्रोगेटी या इटालियन पेट्रोकेमिकल कंपनीचे प्रतिनिधी क्वात्रोची हे या व्यवहारातील मध्यस्थ होते असा आरोप आहे. क्वात्रोची हे गांधी कुटुंबीयांचे निकटवर्ती असल्याने स्वाभाविकच संशयाची सुई राजीव गांधी यांच्याकडेही वळली. त्यांच्याबरोबरच तत्कालीन संरक्षण सचिव एस. के. भटनागर, िहदुजा बंधू, एबी बोफोर्सचे दलाल विन चढ्ढा, एवढेच नव्हे तर राजीव गांधी यांचे मित्र अमिताभ बच्चन यांचेही नाव गोवले गेले. यातील काही जणांवर खटलाही भरण्यात आला. तो सुरू असतानाच भटनागर, चढ्ढा यांचे निधन झाले.

****

राजीव गांधी यांचे नाव खटल्यातून वगळले…

‘बोफोर्स’ प्रकरणी राजीव गांधी यांची खटला दाखल होण्याआधीच हत्या झाली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने २००१ मध्ये त्यांचे नाव खटल्यातून वगळले, तर २००५ मध्ये याच न्यायालयाने िहदुजा बंधूची सुटका केली आणि सुमारे पाव शतकांच्या चारित्र्यहननानंतर एप्रिल २०१२ मध्ये राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांचीही लाचखोरीच्या आरोपातून सुटका झाली. ‘हिंदू’च्या (आणि नंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या) पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी भारतात सर्वप्रथम बोफोर्स घोटाळ्याचा गौप्यस्फोट केला होता. पुढे अनेक वष्रे त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. ‘स्टिंग’ या नावाची व्यक्ती त्यांना कागदपत्रे पुरवीत होती. गेल्या वर्षी या िस्टगने पहिल्यांदाच आपली ओळख जाहीर केली. स्टेन िलडस्ट्रोम असे त्यांचे नाव. ते स्वीडनचे पोलीस प्रमुख होते. राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांनी लाच घेतली नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले.

****

भाजपला आरोप सिद्ध करता आले नाही…

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीव गांधी यांची सत्ता गेली. हे आरोप करणारे एकेकाळचे त्यांचे विश्वासू सहकारी विश्वनाथ प्रतापसिंह पंतप्रधान झाले. परंतु त्यांना किंवा त्यांचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अरुण जेटली यांना किंवा त्यानंतर सलग पाच वष्रे सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत आघाडी सरकारला, अशा कोणालाही राजीव गांधी यांच्यावरील आरोप सिद्ध करता आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय राजकीय व्यवस्था ढवळून काढणाऱ्या या इतक्या महत्त्वाच्या प्रकरणाचा छडा लावण्यात ‘सीबीआय’सारख्या तपासयंत्रणेला यश मिळाले नाही. ‘बोफोर्स’ने पुरविलेल्या तोफा चांगल्या प्रतीच्या आहेत. कारगिल युद्धात ते सिद्ध झाले आहे. त्यांची किंमतही बाजारभावानुसार योग्य होती. तरीही त्या खरेदीव्यवहारात घोटाळा झाला. तो कोणी केला हे आजही नि:संशय कोणी सांगू शकत नाही. त्या घोटाळ्याने एकदा काँग्रेसची सत्ता घालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा बोफोर्स प्रकरणाला फुंकर घातली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाराचाराचे आरोप करीत मोदी पुन्हा एकदा ‘बोफोर्स’ची चर्चा घडवून आणत आहेत. मात्र, १९८६ पासून ते २०१९ पर्यंत जेवढी काँग्रेस विरोधी सरकार केंद्रात स्थापन झाले. त्यांना बोफर्स प्रकरणात काहीच हाती लागलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. यावर २०१८ मध्ये ‘सीबीआय’ ने सर्वोच्च न्यायालयाकडे बोफोर्स प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्याची परवानगी मागीतली होती. पण, न्यायालयाने ही मागणी रद्द केली होती.

स्त्रोत : इंडियन एक्सप्रेस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button