breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘बेस्ट’च्या भाडेकपातीला मुंबई महापालिका सभागृहाची मंजुरी

लवकरच पाच किमीचा प्रवास पाच रुपयांमध्ये; परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी

मुंबई : प्रवाशांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी, तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी  बेस्ट समितीने मंजूर केलेल्या बसभाडे कपातीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका सभागृहानेही गुरुवारी हिरवा कंदिल दाखवला.

पालिका सभागृहाने मंजुरी दिल्याने मुंबईकरांना पाच कि.मी. चा प्रवास बेस्टच्या सर्वसाधारण बसगाडय़ांमधून पाच रुपयांमध्ये, तर वातानुकूलीत बसमधून सहा रुपयांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.  त्यामुळे स्वस्त बेस्ट प्रवासासाठी मुंबईकरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तोटय़ाच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिकेने काही उपाययोजना करण्याची सूचना बेस्टला केली होती. या उपाययोजनांचाच एक भाग असलेल्या भाडे कपातीला बेस्ट समितीने गेल्या मंगळवारी मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार पाच कि.मी. साठी पाच रुपये, तर वातानुकूलीत बससाठी सहा रुपये भाडे  आकारण्यात येणार आहे. बेस्ट समितीने मंजूर केलेला हा प्रस्ताव पालिका सभागृहात सादर करण्यात आला होता. तो पालिका सभागृहाने एकमताने मंजूर केला. आता हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर  या भाडेकपातीची अंमलबजावणी होणार आहे.

‘बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका आवश्यक’

भाडेकपातीमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल. त्यामुळे  बसगाडय़ांची संख्या कमी पडेल. त्यासाठी आवश्यक ती तरतूद करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याची सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. तसेच समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि अन्य नगरसेवकांनी या योजनेला एकमताने पाठींबा दर्शविला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button