breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहारमध्ये मतदानाच्या अंतिम टप्प्याला सुरुवात, नवा रेकॉर्ड करण्याचे मोदींचे आवाहन

पाटना – बिहार विधानसभा निवडणुकीचा आज अंतिम टप्पा असून १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या मतदानातून 1 हजार 208 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह आज वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. या ठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील मतदारांना मतदानाचा नवा रेकॉर्ड बनवण्याचे आवाहन केले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलंय की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरु आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, सर्वांनी जास्तीत-जास्त संख्येत मतदान करुन लोकशाहीच्या या सोहळ्याचे भागीदार बना. मोठ्या संख्येंने मतदान करुन नवा रेकॉर्ड प्रस्थापित करा. सर्वांनी मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत बिहारमधील मुजफ्फरपूर मतदारसंघात सर्वाधिक 28 उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. तर जोकीहाट, बहादूरगंज, त्रिवेणीगंज आणि ढाका या मतदारसंघात प्रत्येकी 9 उमेदवार आमने-सामने आहेत. सीमांचल या मुस्लीम बहुल भागात जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर यादव बहुल कोसी आणि ब्राह्मण बहुल मिथिलांचलमधील काही जागांवरही ‘कांटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टप्प्यात महाआघाडीतून काँग्रेसचे 25 तर RJDचे 46 उमेदवार रिंगणात आहेत. तर NDA कडून भाजप 35 जागांवर आणि JDU 37 जागी लढत आहेत. 5 ठिकाणी सीपीआय (माले), तर 2 ठिकाणी सीपीआयने आपले उमेदवार उतरवले आहेत. याचबरोबर VIP 5 तर हम एका जागेवर निवडणूक लढवत आहे. तर AIMIM च्या असदुद्दीन ओवेसी यांनी जवळपास 2 डझन जागांवर दंड थोपटले आहेत.

नितीश कुमारांवर भरसभेत कांदाफेक

विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार निवडणूक प्रचारासाठी 3 नोव्हेंबर रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाथी विधानसभा क्षेत्रात गेले होते. यावेळी भाषण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कांदे फेकले. यावेळी त्या व्यक्तीने भर प्रचारसभेत नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

“बिहारमध्ये बिनधास्तपणे मद्यविक्री होत आहे. तस्करी केली जात आहे. पण तुम्ही काहीच करु शकत नाही”, अशाप्रकारची घोषणाबाजी नितीश कुमार यांच्यावर कांदा फेकणाऱ्या व्यक्तीने केली. यावेळी नितीश कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, “फेकू द्या, जेवढं फेकायचं आहे तेवढं फेकू द्या”, असं नितीश कुमार म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण पुन्हा सुरु ठेवलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button