breaking-newsराष्ट्रिय

बिहारमधील 175 दंगलखोर कॉन्स्टेबल्स बरखास्त, 23 जण निलंबित

पाटणा– बिहारमधील 175 दंगलखोर कॉन्स्टेबल्सची नोकरीवरून हकालपट्‌टी करण्यात आली आहे. शुक्रवारी पाटण्यामध्ये पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि सार्वजनिक व खासगी मालमत्तेची नासधूस केली होती. त्याबाबत ही कारवाई करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

कामावरून कमी करण्यात आलेल्या कॉन्स्टेबल्समध्ये एक हेड कॉन्स्टेबल, प्रशिक्षणार्थींची ड्यूटी लावण्याची जबाबदारी असलेले दोन कॉन्स्टेबल आहेत. कामावरून कमी करण्यात आलेल्या 167 प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबल्स मध्ये निम्म्याहून अधिक महिला कॉन्स्टेबल असल्याची माहिती पाटणा विभागाचे पोलीस महासंचालक नैयर हसनैन खान यांनी दिली आहे. पाटणा पोलीस लाईनमध्ये ड्यूटीवर असलेल्या अन्य 23 कॉन्स्टेबल्सना निलंवित करण्यात आल्याचेही खान यांनी सांगितले आहे. शुक्रवारी पाटण्यात झालेल्या पोलीसांच्या हिंसाचाराचा तपास करून कारवाई करण्याची जबाबदारी खान यांच्यावर सोपवण्यात आली होती.

सविता पाठक नावाची पोलीस कॉन्स्टेबल शुक्रवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये मरण पावली. पोटदुखीमुळे तिला ड्यूटी अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आजारी असूनही सविता पाठकला ड्यूटी लावल्यामुळे प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबल्सनी निषेधार्थ हिंसाचार सुरू केला होता.

सविता खरोखर आजारी होती. तिने ऑक्‍टोबर महिन्यात तीन दिवस रजा घेतली होती. अशा परिस्थितीत तिला ड्यूटी लावणे योग्य नव्हते अशी नोंद करून खान यांनी तिला योग्य ट्रीटमेंट न दिल्याबद्दल पोलीस लाईन हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसरवर कारवाईची शिफारस केली आहे.

90 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी 4 वर्षांपेक्षा अधिक काळ पोलीस लाईनमध्येच ड्यूटी करत आहेत. ही बाब अयोग्य असून त्यांच्या बदलीची आवश्‍यकताही खान यांनी नमूद केली आहे. या प्रकरणी 4 एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक के एस द्विवेदी यांच्याकडे मागितला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button