breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बाल गिर्यारोहक साई कवडे आणि कृष्णा ढोकले यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार

पिंपरी |प्रतिनिधी

युरोप मधील सर्वोच्च शिखर एलब्रुसवर चढाई करून भारताचा राष्ट्रध्वज तेथे फडकविणारा ११ वर्षीय बाल गिर्यारोहक साई कवडे आणि भारतातील सर्वोच्च शिखर माऊंट कांचनजुंगा सर करणारे गिर्यारोहक कृष्णा ढोकले यांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या सत्कार समारंभास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, क्रीडा कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्य माऊली थोरात, नगरसदस्या आरती चोंधे, झामाबाई बारणे, निर्मला कुटे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अंकुश कानडी, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, क्रीडा विभागाचे उप आयुक्त संदीप खोत, आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

साहसी खेळामध्ये यश संपादन करण्यासाठी साई कवडे आणि कृष्णा ढोकले या गिर्यारोहकांनी खडतर परिश्रम करून प्राप्त केलेले यश कौतुकास्पद असून शहराच्या नावलौकिकात भर घालणारे आहे. उदयोन्मुख खेळाडूंनी यापासून प्रेरणा घेऊन शहराचे नाव अधिक उज्वल करावे असे महापौर ढोरे यावेळी म्हणाल्या.

साई सुधीर कवडे याने आतापर्यंत सह्याद्री पर्वतरांगेतील शेकडो गड किल्ले भ्रमंती केले आहेत तसेच हिमालयातील मोहिमेत शिखर स्टोक क्रांगी बेस कॅम्प ५ सप्टेंबर २०१९ रोजी तसेच आफ्रिकेचे सर्वोच्च शिखर किली मांजारो २६ जानेवारी २०१९ रोजी व युरोपमधील सर्वोच्च शिखर एलब्रुस १५ ऑगस्ट २०१९ रोजी चढाई करून भारताचा ध्वज फडकवत बाल वयात अनोखा विक्रम केला आहे. त्याच्या या साहसाची नोंद इनक्रिडेबल बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस, हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्डस, व एशिया बुक ऑफ रेकॉर्डस या सारख्या पुस्तकात झाली आहे. एलब्रुस शिखर यशस्वी सर करणारा साई हा आशिया खंडातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे.

कृष्णा ढोकले यांनी साहसी खेळ प्रकारातील जगातील तिस-या क्रमांकाचे आणि भारतातील सर्वोच्च शिखर माऊंट कांचनजुंगा सर करून पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. तसेच शहरातील एकमेव डबल अष्ट हजारी शिखरवीर होण्याचा बहुमान मिळवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button