breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बायो मेडिकल वेस्ट’च्या निविदेत आयुक्तांकडून ठेकेदाराला ‘शंभर कोटी’ची बक्षिसी

मे.पास्को इन्व्हारमेंटल सोल्युशन कंपनीच्या कामात मोठा गैरव्यवहार

शहरातील काही राजकीय नेत्यांची भागीदारी?, चुकीचे कंत्राट रद्द करा; अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जैव वैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) गोळा करण्याचे काम मे.पास्को इन्व्हारमेंटल सोल्युशन प्रा. लि. कंत्राटदाराला दिले. त्या कामाची मुदत फ्रेबुवारी 2020 मध्ये संपली. त्यानंतर नव्याने निविदा न राबविता पुन्हा त्याच कंत्राटदाराला पंधरा वर्षांचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचे सुमारे शंभर कोटी रुपये कंत्राटदाराच्या घशात घातले आहेत. हे काम रद्द करावे, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालये व दवाखान्यांमध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) गोळा करण्याच्या कामात खूप मोठा गैरव्यवहार व भ्रष्टाचार सुरू आहे. करारनाम्यातील अटी-शर्तीचा व शब्दरचनेचा फायदा घेऊन प्रशासन ठेकेदारावर उदार होऊन कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता 15 वर्षे एवढ्या दीर्घ कालावधीसाठी मे.पास्को इन्व्हारमेंटल सोल्युशन प्रा. लि. कंत्राटदार कंपनीस ठेका देण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 13 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महानगरपालिका प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने आणलेल्या या विषयास कडाडून विरोध केला. या विरोधामध्ये सत्ताधारी नगरसेवकांचा देखील समावेश होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील या प्रस्तावात प्रशासनाकडून झालेल्या चुकांची व दप्तर दिरंगाईची कबुली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे दिली. त्यांनी काही पर्याय देखील सभेसमोर ठेवले होते. मे.पास्को इन्व्हारमेंटल सोल्युशन प्रा. लि. कंत्राटदार कंपनीस हे काम देण्याचा विषय मंजूर केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून यापूर्वी 15 वर्षे ज्या कंत्राटदार कंपनीकडे हे काम आहे. त्याच कंत्राटदार कंपनीला पुन्हा 15 वर्षांसाठी काम देणे, म्हणजे हा उघड उघड गैरव्यवहार आहे. यात महानगरपालिका प्रशासन व कंत्राटदार कंपनी यांच्यात आर्थिक साटेलोटे असण्याची दाट शक्यता निश्चित आहे. त्या बरोबरीने सत्ताधा-यांनी सभागृहात ज्या पध्दतीने हा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेमुळे नेमके या बायो मेडिकल वेस्टचे कंत्राट मे.पास्को इन्व्हारमेंटल सोल्युशन प्रा. लि. कंपनीला देण्यामागं काय दडलं आहे ? हा प्रश्न पडतो आहे. कामे थेट पध्दतीने करण्याचा सपाटा लावलेला आहे. परंतु, कोणतीही निविदाप्रक्रिया न राबविता एखाद्या कंपनीला एवढे मोठे कंत्राट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील करदात्या नागरिकांची मोठी फसवणूक होत आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा होत असल्याने या कंत्राटावर संशय निर्माण झालेला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बदनामीबरोबर मोठे आर्थिक नुकसान देखील होत आहे. तरी तात्काळ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून चुकीच्या पध्दतीने दिले जाणारे हे कंत्राट रद्द करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन म्हणजे मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. असेही म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button