breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बाजारात तुरी, अन् राष्ट्रवादीत मारामारी; चिंचवड विधानसभेत इच्छुकांची “भाऊगर्दी”

  • पक्षाला तारण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज

पिंपरी| (अमोल शित्रे) – आगामी विधानसभा निवडणुकीला दीड वर्षाचा विलंब असताना चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अक्षरशः गर्दी झाली आहे. त्यातच सर्वत्र भाजप आणि मोदी प्रभावाचा मारा होत आहे. अशा परिस्थितीत पक्षाला तारणारा  राष्ट्रवादीचा एकही खासदार किंवा आमदार शहरात नाही. त्यातच,  चिंचवड विधानसभेचा विचार करता पक्षाची अवस्था म्हणजे ‘बाजारात तुरी अन् राष्ट्रवादीत मारामारी’ अशीच झाली आहे.

एकेकाळी शहराचा हुकुमी एक्का मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते अजित “दादा” पवार यांच्या दिमतीला शहरातून तीन आमदारांची ताकद होती. भोसरीतून विलास लांडे, चिंचवडमधून लक्ष्मण जगताप आणि पिंपरीतून अण्णा बनसोडे या तगड्या नेत्यांची फौज होती. मागील विधानसभेला मोदी नावाची लाट आल्याने ऐनवेळी चाल बदलून जगताप यांनी फासे फिरविले. यात दादांची रणनिती फेल ठरली. या लाटेत विलास लांडे आणि अण्णा बनसोडे यांनी मार खाल्ला. शहराची हुकूमत एकट्या जगतापांच्या हाती गेली. आता जगताप डोईजड झाल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी “दादां”नी चिंचवड विधानसभा ‘हिट लिस्ट’वर घेतली आहे. त्यामुळे ही विधानसभा लढविण्यासाठी “दादां”समोर इच्छुकांच्या उठबशा सुरू आहेत. सलग तीनवेळा नगरसेवक होऊन पराभूत झालेल्या कार्यकर्त्यांना सुध्दा जगताप यांच्या विरोधात चिंचवड विधानसभा लढविण्याचे वेध लागले आहेत. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून स्वतःवर शिक्का नसलेल्या आयातखोरांनी देखील जगताप यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. नव्या आणि जुन्या अशा एकूण सहा जणांनी राष्ट्रवादीच्या तिकीटासाठी “दादां”कडे याचना केली आहे.

मागच्या चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे तिकीट विठ्ठल नाना काटे यांना दिले होते. मात्र, काटे यांचा प्रभाव पडत नसल्याने आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा नवखा उमेदवार असणार आहे, अशी चर्चा आहे. मात्र, काटे यांनी पक्षनिष्ठा जपत तयारी सुरू ठेवली आहे. पक्षाचे विद्यमान नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मागील विधानसभा अपक्ष लढविली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. सध्या भोंडवे पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच पक्षाचे स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना “दादा” निवडणुकीत उतरविणार असल्याची चर्चा आहे. पक्षाचे कार्यकर्ते संदीप पवार यांनी देखील तिकीट मिळविण्यासाठी इच्छा प्रकट केली आहे. तर,सांगवीतून सलग तीनवेळा नगरसेवक राहिलेले पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी जगतापांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. याहून विशेष बाब म्हणजे आमदार जगताप यांना शह देण्यासाठी अडनावात साधर्म्य असलेले माजी नगरसेवक राजेंद्र जगताप राष्ट्रवादीला योग्य उमेदवार वाटू लागले आहेत. यापैकी राष्ट्रवादीचा खरा चेहरा कोण असणार?, की जगतापांना पाडण्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबरोबर बंडखोर उमेदवाराला रिंगणात उतरविण्याची “दादा” खेळी करणार?,याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

——

चिंचवड विधानसभा मतदार संघातील जनता भाजपच्या कामांवर नाराज आहे. विद्यमानांच्या चुकांवर कोणी बोट दाखवायला तयार नाही. ही भिती मोडीत काढण्यासाठी मी तयारी करत आहे. महापालिका निवडणुकीत पडलेल्या मतांचा विचार करता चिंचवड विधानसभेची निवडणूक सोपी वाटते. पक्षाचे अधिकृत तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक

—–

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चिंचवड विधानसभा मतदार संघातील पराभूत उमेदवार तसेच विविध पक्षाच्या माजी नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामकाज सुरू आहे. युवकांना सोबत घेऊन नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. सामाजिक संस्था, संघटना, मंडळांना मदत करून मतदारांना विश्वासात घेण्यावर भर आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी सध्या प्रयत्न आहेत.

– मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक

——

पक्षाने उमेदवारांची अद्याप शोधाशोध सुरू केलेली नाही. तथापि, जो कोणी इच्छुक असेल त्याचे त्यादृष्टीने प्रयत्न असतील. परंतु, या विषयावर दादांसोबत अद्याप चर्चा झालेली नाही. मला विरोधी पक्षनेता पद मिळाले नाही, म्हणून मी पक्षावर नाराज नाही. कारण, दादांनी मला थांबायची सूचना केली आहे. तरीही, विधानसभेच्या दृष्टीने लोकांच्या भेटीगाठी घेणे, विकास कामांवर चर्चा करणे, त्यांचे प्रश्न सोडविणे आदी कामे सुरू आहेत.

– विठ्ठल (नाना) काटे, विद्यमान नगरसेवक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button