breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बदलत्या तापमानामुळे मुंबईकर बेजार

ताप, सर्दी, खोकल्यासह डोळय़ांच्या संसर्गालाही सुरुवात

दिवसा लागणारे उन्हाचे चटके आणि रात्री जाणवणारा गारवा यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. ऋतुबदलाच्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप अशा विषाणूजन्य आजारांचे प्रमाण शहरात वाढत आहे. तसेच वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाची सुरुवात झाली आहे.

सध्याचा काळ हा ऋतुबदलाचा कालावधी असून यामध्ये रात्रीचे घसरणारे तापमान आणि दिवसा चढणारा पारा यामुळे हवेतील विषाणूंचे प्रमाण वाढत असते. या वाढत्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणातही वाढ होत असते. सध्या उपचारांकरिता येणारे बहुतांश रुग्ण हे वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या संसर्गाने बाधित आहेत, असे डॉ. निनाद घोलकर यांनी सांगितले. घसा दुखणे, सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये गेल्या आठवडय़ापासून जवळपास २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. बहुतांश रुग्ण हे घशाच्या संसर्गाची तक्रार घेऊन येत आहेत.  तसेच कोणताही आजार नसला तरी दररोज सकाळी कोमट पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर आहे. यामुळे संभाव्य घशाचा संसर्ग टाळणे शक्य आहे. तसेच या काळात शरीरातील साखर आणि मिठाचे प्रमाण कमी होते. मधुमेहाचे रुग्ण वगळता दररोज थोडासा गूळ खाल्ल्यास दोन्हींचा समतोल शरीरात राखण्यास मदत होते, असेही पुढे डॉ. घोलकर यांनी सांगितले.

गेल्या आठवडाभरापासून दिवसा उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे डोळ्याच्या संसर्गाचे रुग्ण बरेचसे येत आहेत. आठवडाभरात जवळपास चार ते पाच रुग्णांना डोळे आल्याचे आढळले. सध्या हे प्रमाण कमी असले तरी नुकतीच सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर याचा संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याचे डॉ. केतन मेहता यांनी सांगितले. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानेही विषाणूजन्य आजारांची बाधा होऊ शकते. तसेच दुपारच्या वेळी तीव्र उन्हात जाताना थेट चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर उन्हाचे चटके बसणार नाहीत याची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. मेहता यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button