breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फूटपाथवर उभारले ‘होर्डिंग्ज’, ‘आकाशचिन्ह’चा सेवानिवृत्त अधिकारी बनला ठेकेदार?

पदपथावरील होर्डिंग्ज पडून एखादी दुदैवी घटना घडल्यास जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्त्यांचा आयुक्तांना सवाल

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

चिंचवड स्टेशन चाैकातील महापुरुषाच्या अर्धपुतळ्या शेजारीच भला मोठा होर्डिग्ज उभारण्यात आला आहे. पदपथावरच हे होर्डिग्ज उभारल्याने पादचा-यांना त्याचा अडथळा होवू लागला आहे. विशेषता: आकाशचिन्ह परवाना विभागातील एका सेवानिवृत्त अधिका-याने हे होर्डिग्ज उभारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पदपथावरील होर्डिग्ज पडून एखादी दुदैवी घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीत म्हटले आहे की, चिंचवड स्टेशन चौकात महापुरूषांच्या पुतळ्याच्या नजिक फुटपाथाच्या जागेवर उंच लोखंडी होर्डिंग्ज उभे केले आहे. त्यावर जाहिराती लावल्या जात आहेत. सध्या परतीच्या पाऊसाचा काळ आहे. वादळ अथवा चक्रीवादळामुळे होर्डिंग चुकून पडला, त्यात काही दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? पादचार्यांसाठी राखीव असलेल्या फुटपाथावर होर्डिंग्सला परवानगी दिलीच कशी जाते? उद्या महापालिका भवनाच्या टेरेसवर होर्डिंग्स लावण्याची परवानगी मागितल्यास महापालिका त्याला परवानगी देणार का? असा सवाल विचारला जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज, बॅनरबाजीला पेव फुटले आहे. चिंचवड स्टेशन चौकात आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्ध पुतळ्याच्या शेजारी देखील लोखंडी होर्डिंग उभा करण्यात आला आहे. सदर चौकात सिग्नल असल्याने तेथे वाहनांची नेहमीचीच वर्दळ असते. या धोकादायक होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

पुण्यातील जुना बजार येथील चौकात वजनदार होर्डिंग कोसळून अपघात झाला होता. त्यात जिवीतहानी झाली होती. अनेक जण जखमीही झाले होते. या मोठ्या दुर्घटनेची पुनरावृत्ती पिंपरी चिंचवड शहरात घडली तर याला जबाबदार कोण ?, तसेच खुद्द आकाशचिन्ह परवाना विभागातील एका सेवानिवृत्त मुख्य लिपीकाकडून सदर होर्डिंग्स उभारले गेले आहे. तसेच रावेत परिसरातील एका नगरसेविकेने देखील महामार्गावर होर्डिग्ज उभारले आहेत. याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आकाशचिन्ह परवाना विभाग झोपेत काम करतो का?, फुटपाथच्या जागेवर परवानगी देणार्या अधिका-यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच कुदळवाडी, घरकुल चौक येथेही अशाच प्रकारचे होर्डिंग्स महापालिकेतील भाजपच्या माजी पदाधिका-यांने उभारले आहेत. यामुळेच महापालिका यावर कारवाई करत नाही. तसेच निगडी येथील कै.मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली फुटपाथावर होर्डिंग्स उभे करण्यात आलेले आहेत. पादचार्यांना चालण्यासाठी बनविलेल्या फुटपाथावर होर्डिंग्सचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पदपथावरुन नागरिकांना चालण्यासाठी जागाच शिल्लक ठेवलेली नाही. त्यामुळे चिंचवडसह शहरातील फुटपाथांवर उभारलेले होर्डिंग्स तात्काळ हटविण्यात यावेत,अशी मागणी खैरनार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button