breaking-newsक्रिडा

फलंदाजांकडून षटकारांची आतषबाजी?

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका

आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताला वेस्ट इंडिजकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा

अनुभवी फलंदाज महेंद्रसिंग धोनीला डच्चू देत नव्या दमाच्या खेळाडूंसह संघबांधणी करण्यास सज्ज असलेल्या भारतीय संघाची रविवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेत खरी कसोटी लागणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या या सामन्यात कोणता संघ ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला षटकारांची आतषबाजी करणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.

विराट कोहलीला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असल्याने रोहित शर्माच्या खांद्यावर भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फलंदाजीत भारताची मदार रोहितशिवाय प्रामुख्याने शिखर धवनवर राहणार आहे. विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धवनला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते, त्यामुळे येथे त्याला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. अंबाती रायुडूच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. तर यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतचा संघातील समावेश निश्चित आहे.

गोलंदाजीत यॉर्कर टाकण्यात पटाईत असलेल्या जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर भारताची भिस्त आहे. मात्र कोलकाताच्या खेळपट्टीवर भारत खलिल अहमदसह तीन वेगवान गोलंदाजांना खेळवणार की कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांच्यासह डावखुरा फिरकीपटू कृणाल पंडय़ाला संधी देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दुसरीकडे वेस्ट इंडिजला २०१६चा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कर्णधार कालरेस ब्रॅथवेटला कोलकाताचे मैदान फारच प्रिय आहे. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सला सलग चार षटकार ठोकून त्याने विंडीजला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यातच किरॉन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो, आंद्रे रसेल यांच्या सहभागाने विंडीजची ताकद आणखी वाढली आहे.

संघ

भारत (१२ खेळाडू) : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, ऋषभ पंत, कृणाल पंडय़ा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलिल अहमद.

वेस्ट इंडिज : कालरेस ब्रॅथवेट (कर्णधार), फॅबिअन अ‍ॅलेन, डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, कीमो पॉल, किरॉन पोलार्ड, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, शेर्फान रुदर्रफोर्ड, ओशेन थॉमस, खॅरी पीअर, ओबेड मकॉय, रोवमन पॉवेल, निकोलस पूरन.

* सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button