breaking-newsराष्ट्रिय

प्राध्यापकांना ‘स्वयम’च्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण

मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून 75 राष्ट्रीय स्रोत केंद्रे अधिसूचित 
नवी दिल्ली- उच्च शिक्षण क्षेत्रातल्या प्राध्यापकांना ऑनलाईन स्वरुपाचा रिफ्रेशर कोर्स म्हणजेच प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘स्वयम्‌’ या प्लॅटफॉर्मच्या मदतीने देशातल्या 15 लाख प्राध्यापकांना विविध संस्थांमधून विविध विषयासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात विविध विषयांच्या अभ्यासक्रमांसाठी 75 राष्ट्रीय स्रोत केंद्रे अधिसूचित करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला जाईल. यात प्रत्येक विषयाची अद्ययावत माहिती नवे आणि येऊ शकणारे विषय तसेच शैक्षणिक सुधारणा आणि सुधारित अभ्यासक्रम शिकवण्यासाठीच्या पद्धती या सगळ्यांचा विचार करणे अपेक्षित आहे.

यासाठी निवड करण्यात आलेल्या 75 संस्थांमध्ये पं. मदनमोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण अभियानाअंतर्गत येणारी केंद्रीय विद्यापीठे, आयुका, आयआयएस, आयआयटी, आयआयएसईआर, एनआयटी, राज्यातील विद्यापीठे अशा अनेक संस्थांचा समावेश आहे. या संस्थांमधून चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात समाजशास्त्र, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, शिक्षण नियोजन आणि व्यवस्थापन, सार्वजनिक धोरण, नेतृत्व आणि प्रशासन, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स आणि खगोल विज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत सेवेत असलेल्या सर्व प्राध्यापकांना हा अभ्यासक्रम करणे अनिवार्य आहे. विषय आणि ज्येष्ठता याच्या पलिकडे जाऊन या प्राध्यापकांना नवे तंत्रज्ञान आणि शिकवणुकीच्या आधुनिक पद्धतीचे ज्ञान या अभ्यासक्रमातून मिळणार आहे. यासाठी या केंद्रात शैक्षणिक मॉड्यूल दरवर्षी 15 जूनपर्यंत तयार केले जाईल. स्वयमच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना या अभ्यासक्रमाची पुस्तके ऑनलाईन स्वरुपात 1 ऑक्‍टोबरपर्यंत उपलब्ध होतील. प्राध्यापकांचा प्रतिसाद बघून हा अभ्यासक्रम पुन्हा एकदा जानेवारीमध्ये घेतला जाईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्राध्यापकांची यादी प्रमाणपत्रासह 31 डिसेंबर 2018 रोजी जारी केली जाईल. या केंद्रांमध्ये महाराष्ट्रातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. यात पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद इथल्या संस्था असून हवामान बदल, ऊर्जा व्यवस्था अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन आणि कौशल्य विकास अशा विषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button