breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

प्रवासी कर, पोषण अधिभाराची रक्कम माफ करा

बेस्टची परिवहन विभागाकडे मागणी;  नोव्हेंबरपासून नियमितपणे रक्कम भरण्याची तयारी

प्रवासी कर व पोषण अधिभाराची एकूण ५०० कोटी रुपये थकीत रक्कम माफ करा, अशी विनंती बेस्ट उपक्रमाने शासनाकडे केली आहे. थकीत रकमेमुळे बेस्ट उपक्रमाची तीन बँक खाती गोठविण्यात आली होती. मात्र परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली. यावर लवकरच बैठक होऊन निर्णयही होणार आहे; परंतु ही रक्कम माफ करा, असे परिवहन विभागाला लेखी निवेदन दिल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.

बेस्टच्या तिकिटावर १५ पैसे पोषण अधिभार आकारला जातो. त्याची रक्कम ही दरमहा शासनाच्या परिवहन विभागाकडे भरली जाते. तसेच साडेतीन टक्के प्रवासी करही बेस्टकडून भरण्यात येतो; परंतु गेल्या सात ते आठ वर्षांत ही रक्कम शासनाकडे भरलीच नाही. जवळपास ५०० कोटी रुपये एवढी थकीत रक्कम राहिल्याने परिवहन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बेस्टची तीन खाती गोठवण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार पाच दिवसांपूर्वीच खाती गोठविण्यात आली. बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार थांबू नयेत यासाठी त्याच्या प्रक्रियेला परिवहनमंत्र्यांकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मात्र बेस्टला सवलत द्यावी किंवा ही रक्कम माफ करावी, अशी मागणी बेस्ट प्रशासनाकडून परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे.

याविषयीही गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी चर्चा केली. बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी परिवहनमंत्री रावते यांची भेट घेतली. या वेळी बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनीही भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी करणे गरजेचे होते; परंतु तसे केले नाही. खाते गोठविले तेव्हाही बेस्ट प्रशासन कुठे गेले होते, हादेखील प्रश्न असल्याचे समिती सदस्य अनिल कोकीळ म्हणाले. प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक उपस्थित असणे आवश्यक होते; परंतु तसे झाले नसून त्याचा निषेध व्यक्त करत असल्याचे सदस्य राजेश कुरुळे यांनी सांगितले.

या वेळी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना पोषण अधिभार व प्रवासी कराची रक्कम थकल्याने तीन बँक खाती गोठविल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली. बेस्टच्या आर्थिक परिस्थितीची माहिती परिवहनच्या प्रधान सचिवांना सांगितली. ही रक्कम माफ करावी किंवा सवलत देण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. यावर लवकरच एक बैठकही होणार आहे.

दरमहा पाच कोटी रक्कम

पोषण अधिभार व प्रवासी कराची परिवहन विभागाला देण्यात येणारी थकीत रक्कम ही ५०० कोटी रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम माफ करण्याची विनंती बेस्टकडून करण्यात आली. मात्र आता यापुढे अधिभार व प्रवासी कराची नवीन रक्कम नियमितपणे नोव्हेंबरपासून भरण्यात येईल. ही रक्कम दरमहा पाच कोटी रुपये एवढी असेल; पण त्याआधीच्या ५०० कोटी रुपये रकमेवर तोडगा काढण्याची विनंती केल्याचे बागडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button